राजू इनामदार
पुणे : तांदळाचे पदार्थ पचायला हलके, खायला चवदार, खिशासाठीही फार भारी नाहीत. त्यामुळे कानडी मुलखातून आलेल्या अप्पम किंवा अप्पे या हलक्याशा पदार्थाने मागील काही वर्षात महाराष्ट्र काबीज करून टाकला आहे. राजकीय उलथापालथ काहीही होऊ द्या, खाद्य पदार्थांना त्याचे काही सोयरसुतक नसते. अप्पम तसेच आहेत. पूर्वी एखाद्या उडपी हॉटेलमध्ये मिळणारा हा पदार्थ आता रस्त्यारस्त्यांवरच्या खाऊ गल्ल्यांमध्ये मुबलक मिळतो.
...असे करतात पीठ
इडलीच्या पिठापेक्षा याचे पीठ थोडे जाड ठेवतात. त्यात पाणी टाकायचे. चवीसाठी मीठ, मग त्यात थोडे दही मिक्स करायचे. मोहरी, तेल, कडीपत्ता याची चांगली तडतडीत फोडणी द्यायची. खायचा सोडा अगदी थोडा. मग हे मिश्रण चांगले ढवळून घ्यायचे. एकजीव झाले पाहिजे. तसेच चमच्याने घेता येईल इतके पातळही. थोडा वेळ बाजूला ठेवल्यानंतर सोड्यामुळे चांगले फुगते. कोणी यात इनोही मिक्स करत असतात.
बीडाचा खास तवा
अप्पमचा खास बीडाचा तवा तापायला ठेवायचा. मध्यभागी गोल खड्डे असलेला हा तवा हल्ली कुठेही मिळतो. ७ किंवा १४ असे गोल खड्डे त्यात असतात. वर झाकायला म्हणून दिले तर काचेचे गोलाकार झाकणही मिळते. ते असले तर जास्त चांगले. तवा तापला, की त्यातल्या खड्ड्यात थोडेथोडे तेल सोडायचे. ते तापले की चमच्याने त्यात तयार झालेले पीठ सोडायचे. सगळे खड्डे भरून झाले की, मग त्यावर ते झाकण ठेवायचे.
हलक्या भुकेचे हलके खाणे
थोड्या वेळाने झाकण काढून पाहायचे. एखादा अप्पम उलटून पाहायचा. खालील बाजू चांगली सोनेरी झालेली असेल तर मग लगेच सगळेच अप्पम पलटी करून पुन्हा झाकण ठेवायचे. तेल टाकावे लागतेच, पण अगदी थोडे. दोन्ही बाजूंनी तयार झालेले असे गरमागरम अप्पे सकाळी नाष्टा म्हणून किंवा मग ४ वाजताच्या भुकेला चहाबरोबर एकदम झकास लागतात.
महाराष्ट्राची कारागिरी
रव्याचेही अप्पम करता येतात. कृती तीच, पण पिठात हिरवी मिरची बारीक चिरून टाकायची. पाहिजे असेल तर गाजराचेही तसेच काप टाकता येतात. काहीजण इडली पात्रात गोल खड्ड्यात पीठ अर्धेच भरतात, त्यावर मग बारीक चिरलेला कांदा टाकतात व त्यावर परत पीठ. अप्पमच्या पोटातला हा कांदा खाताना मध्येच जिभेवर येऊन दाताखाली जातो व चवीत अप्रतिम बदल होतो.
कुठे : रास्ता पेठेत अपोलोसमोर, हिराबाग चौपाटीवर, गोयल गंगा खाऊगल्लीत
कधी : सकाळी व दुपारी ४ नंतर