पुणे : गेल्या दोन दिवसांपासून शहरात चांगलाच उकाडा जाणवत असून कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. सकाळी काही काळ ढगाळ वातावरणाचा अनुभव येत असताना दुपारी कमाल तापमान ३६ अंशांच्या दरम्यान पोचले आहे. तर किमान तापमानातही सरासरीपेक्षा २ ते ३ अंशानी वाढ झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजनुसार रविवारी शहरात मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सकाळी पावसाच्या हलक्या सरी दुपारी उन्हाचा चटका व सायंकाळी पुन्हा हलक्या सरी असे विषम वातावरण शुक्रवारी व शनिवारीही होते. ढगाळ वातावरण शहराच्या बहुतांश भागात तापमान ३६ ते ३९ अंशांच्या दरम्यान पोचले आहे. सरासरीपेक्षा ते २ अंशांनी जास्त आहे. त्यातच किमान तापमानात वाढ दिसून आली असून शहरात उकाडा जाणवत आहे. शनिवारी किमान तापमान २१ ते २४ अंशाच्या दरम्यान होते. त्यात सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार शहरात रविवारी (दि. ९) मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा व हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतरच्या पाच दिवसांतही सायंकाळी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
रविवारी हलका पाऊसहवेतील विसंगती वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे. तसेच बंगालच्या उपसागरावरून राज्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. दिवसाचे तापमान वाढले असल्याने सायंकाळी ढगाळ वातावरणाचा अनुभव येत आहे. त्यामुळे हवामान विभागाने शहरासाठी रविवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यात मेघगर्जनेसह, सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह अति हलका ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याचा दक्षिण भाग वगळता अन्य जिल्ह्यांत यलो अर्लट देण्यात आला आहे.