पुणे : काश्मीर मधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. त्याचबराेबर अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत. या घडनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून पाकिस्तानचा निषेध करण्यात येत आहे. पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांनी जवानांना श्रद्धाजंली अर्पन करताना जाे काेणी पाकिस्तानचे झेंडे जाळण्यासाठी खरेदी करायला येईल त्याला लायटर फ्री देण्यात येत आहे.
14 फेब्रुवारी राेजी पुलवामा येथे सीआरपीएफचा ताफा हायवेवरुन जात असताना अतिरेक्यांनी स्फाेटकांनी भरलेली गाडी या ताफ्यातील बसला धडकवून स्फाेट घडवून आणला. भारतीय सुरक्षा यंत्रणांवरील हा सर्वात माेठा दहशतवादी हल्ला हाेता. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. स्फाेट इतका भयंकर हाेता की 4 ते 5 किलाेमीटर अंतरावर या स्फाेटाचा आवाज ऐकू गेला. या हल्ल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. त्याचबराेबर पाकिस्तानकडून दहशतवादी संघटनांना मदत मिळत असल्याने पाकिस्तानचा बंदाेबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहे. अनेक ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे जाळून पाकिस्तान मुर्दाबादच्या घाेषणा देण्यात आल्या.
पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले हे विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचे झेंडे विकण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या घटनेनंतर पुण्यातील व्यापाऱ्यांमध्ये देखील संताप आहे. मुरुडकर झेंडेवाले यांनी आपल्या दुकानाच्या बाहेर बाेर्ड लावला असून पाकिस्तानच्या झेंड्यावर लायटर फ्री देण्यात येत आहे. त्याचबराेबर या बाेर्डच्या माध्यमातून शहीदांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली आहे. गिरीश मुरुडकर म्हणाले, १४ तारखेला पाकिस्तानमुळे अतिरेकी हल्ल्यात आपले जवान शहीद झाले. त्याबद्दल भारतीय नागरिकांच्या मनात तीव्र भावना उमटल्या आहेत. तुम्ही - आम्ही सर्व जण तर बॉर्डरवर जाऊ शकत नाही. परंतु हा निषेध व्यक्त करावा असे भारतीयांना वाटत आहे. कालपासून हे झेंडे विकण्यास सुरुवात केली. आमच्या तीन पिढ्यांमध्ये एका दिवसात एवढे कुठलेही झेंडे विकले गेले नाहीत. या दुर्घटनेनंतर आजपर्यंत १०० पेक्षा जास्त नग विकल्या गेले आहेत. पुणे सोडून बाहेरील १५ ते २० जिल्ह्यातून सुद्धा हे झेंडे घेण्यासाठी फोन येत आहेत.