शेलपिंपळगाव, दि. 3 (वार्ताहर) : चाकण-शिक्रापूर हायवे रस्त्यावरील अवजड व क्षमतेपेक्षा जास्त उंचीच्या वाहनांमुळे विद्युत्वाहक तारा तुटण्याच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. अशा वाहनांवर कारवाई का होत नाही, असा सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे.चाकण-शिक्रापूर हायवे रस्त्यावरील वाहतुकीत दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणावर वाढ होत चालली आहे. रस्त्यावरून मोठय़ा प्रमाणात गॅस टँकर, अवजड कंटेनर, मोठमोठे ट्रक तसेच दररोजची दळणवळणाची वाहने ये-जा करतात. रस्त्यावरील अजवड व अतिउंच वाहने विद्युत तारांना स्पर्श करून आणखी धोका निर्माण करू लागली आहेत. चाकणहून रांजणगाव गणपती, सणसवाडी शिरूर अशा औद्योगिक वसाहतींकडे मोठमोठय़ा मनिशरी घेऊन येणारी ही वाहने रस्त्यावरून जाणार्या विद्युत्वाहक तारांना अडथळा निर्माण करतात. हा अडथळा काढण्यासाठी वाहक उंच काठीचा वापर करतात; परंतु यामध्ये विद्युत्वाहक तारांचा एकमेकींना स्पर्श होऊन जनित्रात बिघाड होतो. त्यामुळे वीजग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. तरी अशा वाहनांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
अजवड वाहनांमुळे तुटताहेत विद्युत तारा
By admin | Published: May 16, 2014 11:42 PM