थेऊर : घराच्या सुरू असलेल्या बांधकामावर पाणी मारताना महिलेला विद्युत वाहिनीचा शॉक लागल्याची धक्कादायक घटना थेऊर (ता. हवेली) येथे मंगळवारी (ता. २७) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आशा विठ्ठल अवसरे (वय ३६, महादेव मंदिराजवळ, काकडे मळा, थेऊर, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आशा अवसरे यांच्या दोन मजली घराचे बांधकाम मागील काही दिवसांपासून सुरू होते. आशा या दररोज बांधकामावर पाणी मारत असत. नेहमीप्रमाणे आशा या मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घराच्या बांधकामावर पाणी मारत होत्या. घराच्या बांधकामावर पाणी मारल्यानंतर आशा या टेरेसवर पाणी मारण्यासाठी गेल्या होत्या. टेरेसवर पाणी मारताना त्यांच्या घराजवळून गेलेल्या २२ हजार केव्ही क्षमतेच्या विद्युत प्रवाहाच्या तारांचा शॉक बसला आणि आशा या दोन मजली बिल्डिंगवरून खाली कोसळल्या. या अपघातात आशा या गंभीर जखमी झाल्या होत्या.
दरम्यान, आशा यांना तातडीने लोणी काळभोर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु आशा यांचा बुधवारी सकाळी उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने थेऊरसह परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.