- अविनाश ढगे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटी मार्गावरील पीएमपी बसथांब्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक बसथांबे अस्वच्छ आहेत. बहुतांश थांब्यांतील दिवे बंद आहेत. अंधारात दारुड्यांचा अड्डा भरतो. तेथे नामफलक नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडत आहे. थांब्यांवर माहिती देणारी यंत्रणा बंद आहे.
प्रवाशांना जलद प्रवास करता यावा, यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अवाढव्य खर्च करून ‘पीएमपीएमएल’ बससाठी स्वतंत्र बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) मार्गिका बांधण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरात ५२ किलोमीटर बीआरटी सुरू आहे. यात निगडी ते दापोडी, सांगवी फाटा ते किवळे, नाशिक फाटा ते वाकड, चिखली ते जगताप डेअरी स्पाइन रस्ता आणि मॅगझीन चौक ते देहू-आळंदी फाटा या मार्गांचा समावेश आहे.
बहुतांश मार्गांवरील बीआरटी थांब्यांची दुरवस्था झाली आहे. थांब्यांतील दिवे बंद असून, प्रवाशांना रात्री अंधारातच थांबावे लागत आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधोरेखित झाला आहे. थांब्यांवर साफसफाई केली जात नसल्याने अस्वच्छता आहे. अनेक थांब्यांवरील नामफलक गायब झाले आहेत. काही फलकांवरील अक्षरे दिसेनाशी झाली आहेत. यामुळे अनेकवेळा स्थानक लक्षात येत नाही. तेव्हा आजूबाजूला चौकशी करावी लागते. बाहेरगावाहून आलेल्यांचा गोंधळ उडतो.
बीआरटी थांब्यांवर या होत्या सुविधा...
प्रत्येक बीआरटी थांब्यावर ५० ते ६० लाख रुपये खर्च
थांब्यावर जाण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी स्पीड टेबल
दिव्यांग बांधवांना सहज जाता यावे म्हणून रॅम्पची सुविधा
तिकीट तपासण्याकरिता सुरक्षा रक्षकांसाठी प्रशस्त केबिन
प्रवाशांना माहिती देणारे २४ इंच एलईडी स्क्रीन
स्वयंचलित सरकते दरवाजे
प्रवाशांना बसची माहिती देणारी आयटीएमएस यंत्रणा
थांब्यांवर बस घासून अपघात होऊ नये म्हणून रोलर
... आणि सध्या बीआरटी थांब्यांची अवस्था
सुरक्षा रक्षकांच्या केबिनचे दरवाजे तुटलेले, काही ठिकाणी चोरीस गेलेले
प्रवाशांना माहिती देण्यासाठी लावण्यात आलेले एलईडी स्क्रीन गायब
एकाही स्थानकात एलईडी नाही
निगडी ते दापोडी मार्गावरील ३६ पैकी फक्त चिंचवड थांब्यावर स्वयंचलित दरवाजे. तेही बंद!
इतर थांब्यांवरील स्वयंचलित सरकते दरवाजे चोरीस गेलेले
अपघात टाळण्यासाठी बसविण्यात आलेले रोलर तुटलेले
निगडी, जयश्री टॉकीज, काळभोरनगर यासह विविध स्थानकांचे छत तुटलेले
थांब्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असूनही महापालिकेचे दुर्लक्ष
माहिती देणारी आणि नियंत्रणाची यंत्रणा बंद
आयटीएमएस प्रणालीच्या माध्यमातून पीएमपीएमएल बसचे लोकेशन, स्थानकावर बस कधी येणार याची वेळ, मार्ग, कोणत्या थांब्यांवर थांबणार याची माहिती मिळत होती. बसमध्ये पुढील येणाऱ्या थांब्याची उद्घोषणा होत होती. चालकाने बेदारकारपणे बस चालवली तर त्याला चेतावणी देणारी उद्घोषणा, अत्यावश्यक वेळी चालकांना थेट नियंत्रण कक्षात संपर्क साधण्याची सुविधा होती. यासाठी बसमध्ये व्हीटीएस - पॅनीक बटन, ट्रॅकर डीव्हाईस, ऑनबोर्ड युनिट, डेस्टिनेशन बोर्ड, पब्लिक इन्फॉर्मेशन सिस्टिम (पीआयएस), कॅमेरा, अनाउंसमेंट माईक, ड्रायव्हर डॅशबोर्ड युनिट (डीडीयू) लावण्यात आले होते. स्वारगेट येथील मुख्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला होता. तेथूनच चालकांना सूचना दिल्या जात होत्या. पण, ही प्रणाली बंद झाल्यानंतर सर्वच सुविधा ठप्प आहेत.
सुरक्षा रक्षक नाहीत
थांब्यांवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि मालमत्तेच्या रक्षणासाठी खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली होती. पण, पगारावर होणारा खर्च अधिक असल्याचे कारण देत प्रशासनाने त्यांना काढून टाकले. सुरक्षा रक्षक नसल्यामुळे थांब्यांवरील साहित्य चोरीस गेले आहे. हे थांबे दारुड्यांचे अड्डे झाले आहेत. प्रवाशांचे पाकीट, दागिने चोरीच्या घटना वाढल्या आहेत.
घुसखोरी रोखण्यासाठी वॉर्डन नाहीत
पीएमपीएमएलचे आठ बीआरटी मार्ग आहेत. यातून दिवसाला ७५० ते ८०० बस धावतात. बीआरटी मार्गात खासगी वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी पीएमपी प्रशासनाने वॉर्डनची नियुक्ती केली होती. पण, पगारावर अधिक खर्च होत असल्याचे कारण देऊन त्यांना काढून टाकण्यात आले. नंतर वॉर्डन काढून लाखो रुपये खर्च करून प्रायोगिक तत्त्वावर १० ते १२ ठिकाणी बूम बॅरीअर (स्वयंचलित फाटक) बसवले होते. सध्या तेही गायब झाले आहेत.
पीएमपी बस धावत असलेले एकूण मार्ग - ३८९
पीएमपीएमएल ताफ्यात एकूण बस - २१५०
आयटीएमएस यंत्रणा असलेल्या बस - १०३०
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत...
बीआरटी मार्ग - ५
बीआरटी किलोमीटर - ५२
एकूण थांबे - ९२
धावणाऱ्या बस - ४५०-५००
दोन्ही महापालिकांनी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज बीआरटी थांबे उभारले होते. पण, पीएमपीएमएलच्या निष्क्रियतेमुळे त्यांची दुर्दशा झाली आहे.
- बापू गायकवाड, कार्यकारी अभियंता, पीसीएमएसी
बीआरटी थांब्यांची दुरवस्था होण्याला दोन्ही महापालिका आणि पीएमपीएमएल प्रशासन जबाबदार आहेत. देखभाल दुरुस्तीची जबाबदारी दोन्ही महापालिकांची आहे. स्थानकांची त्वरित पाहणी करून दुरुस्त करावेत.
- संजय शितोळे, मानद सचिव, पीएमपी प्रवासी मंच