‘भारत जोडो’ प्रमाणेच आता महाराष्ट्रातही निघणार यात्रा, सर्व तालुक्यांमधून जिल्हा मुख्यालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 12:50 PM2023-08-11T12:50:09+5:302023-08-11T14:02:29+5:30
महाराष्ट्राने दिलेल्या प्रस्तावाला दिल्लीने मान्यता दिली असून २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान राज्यात ही यात्रा चालेल
पुणे: ‘भारत जोडो’ प्रमाणेच आता राज्यातही काँग्रेसकडून यात्रा काढण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातून जिल्हा मुख्यालयात ही यात्रा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्राने दिलेल्या प्रस्तावाला दिल्लीने मान्यता दिली असून २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान राज्यात ही यात्रा चालेल. प्रदेश काँग्रेसने त्याची तयारी सुरू केली आहे.
लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस समितीने देशातील लोकसभा मतदारसंघांचा राज्यनिहाय आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी दिल्लीत प्रत्येक राज्याची बैठक होत आहे. महाराष्ट्राची बैठक मागील आठवड्यात झाली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्यातील २२ नेते बैठकीला उपस्थित होते.
एकेकाळी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या राज्यात ४८ पैकी एकाही जागेवर काँग्रेसचे वर्चस्व नाही. ऐन निवडणुकीच्या वेळेस चंद्रपूरमधून शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले बाळू धानोरकर विजयी झाले. मात्र, त्यांचे निधन झाले. या स्थितीबद्दल दिल्लीतील नेत्यांनी खंत व्यक्त केली व ही स्थिती कशी बदलता येईल याची विचारणा केली.
कार्यकर्त्यांना कृती कार्यक्रम देत त्यात नेत्यांनाही सहभागी व्हायला लावले पाहिजे, असे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी बैठकीत सांगितले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारत जोडासारखी राज्यातही यात्रा सुरू करण्याची कल्पना मांडली. बैठकीला उपस्थित असलेले राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांनी याला लगेचच मान्यता दिली. त्याप्रमाणे नियोजन करण्यास सांगितले.
त्याप्रमाणे प्रदेश काँग्रेसने आता या यात्रेची आखणी केली आहे. विधानसभेच्या २८८ मतदारसंघांतून ही यात्रा जाईल, अशी रचना करण्यात आली आहे. २० सप्टेंबरपर्यंत शेतीची कामे पूर्ण होऊन शेतकरी मोकळे होतील. त्यामुळे २० सप्टेंबरनंतर यात्रा सुरू करण्याचा निर्णय झाला, अशी माहिती प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आली. यात प्रत्येक तालुक्यातून ही यात्रा स्थानिक नेते, कार्यकर्ते यांच्यासह सुरू होईल. तालुक्यातील गावांमधून फिरून ती जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी येईल. राज्यातील नेत्यांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या ठिकाणी यात्रेचा समारोप होईल. यात्रेदरम्यान काँग्रेसची ध्येयधोरणे, देशाची सद्य:स्थिती, महागाई, बेरोजगारी, त्यावर उपाययोजना करण्यात केंद्र सरकारला आलेले अपयश यावर भर देणे अपेक्षित आहे.