पुणे : समाजातील समस्या शोधून त्यांनी विक्राळरूप घेण्याआधीच त्यांना समूळ नष्ट केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, मी मालक नाही तर सेवक आहे. त्यामुळे प्रशासकीय सेवेत येणाऱ्यांनी सेवकाची भूमिका बजवावी. प्रशासकीय व्यवस्थेत पारदर्शकतेला महत्त्व द्यावे. देशातील संपूर्ण व्यवस्थेला प्रगत करण्यासाठी कार्य करणे गरजेचे आहे, असा सल्ला मनोहर पर्रीकर संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्थेचे उपमहासंचालक व एव्हीएसएम, व्हीएसएम (निवृत्त) मेजर जनरल डॉ. बिपीन बक्षी यांनी दिला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी, पुणेतर्फे कोथरूड येथील स्वामी विवेकानंद सभामंडप येथे आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक नेतृत्व विकास कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार व रूलर रिलेशन्सचे संस्थापक प्रदीप लोखंडे यांचीदेखील यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड होते.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर. एम.चिटणीस, प्र-कुलगुरू डॉ. तपण पांडे, स्कूल ऑफ सस्टेनेबल स्टडीजच्या संचालिका प्रा. अनामिका बिश्वास, डॉ. के. गिरीसन आणि डॉ. प्रसाद खांडेकर उपस्थित होते. या देशात आता विचारांनी क्रांती घडवायची आहे. त्यामुळे प्रशासकीय सेवेत येणाऱ्या सर्वांनी संशोधनपर कार्य करून समाजात परिवर्तन घडवावे. मानवाची मनशक्ती ही सर्वात महत्त्वाची असून, त्याआधारेच देशात क्रांती घडेल, असे मत संजय नहार यांनी व्यक्त केले.