पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहात प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेली स्मार्टकार्ड फोन सुविधा आता राज्यातील सर्व कारागृहांमधील कैद्यांना मिळणार आहे. त्यामुळे आता कैद्यांना आपल्या नातेवाईकांशी दहा ते पंधरा मिनिटे बोलता येणार आहे.
येरवडा कारागृहात कैद्यांना स्मार्ट कार्ड फोन देण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. या सुविधेनुसार कैद्यांना एक स्मार्ट कार्ड दिले जाते. त्यामध्ये विशिष्ट रकमेचा बॅलन्स दिला जातो. त्या स्मार्ट कार्डाच्या आधारे कैद्याला त्याच्या नातेवाईकांशी दहा ते पंधरा मिनिटे बोलण्याची संधी मिळते. दहा मिनिटे बोलल्यानंतर त्याच्या कार्डामधील ठराविक रक्कम कापून घेतली जाते, या सुविधेअंतर्गत कैद्यांना त्याच्या नातेवाईकांशी बोलता येत असल्याने त्यांचे नैराश्य कमी होण्यास अडत होत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन ही सुविधा राज्यातील सर्व कारागृहांमधील कैद्यांसाठी राबविण्यात यावी यासाठी कारागृह व सुधारसेवा चे महासंचालक अमिताभ गुप्ता प्रयत्न करीत होते.
त्यानुसार आता येरवडा कारागृहाप्रमाणेच राज्यातील सर्व कारागृहांमधील कैद्यांसाठी ही सुविधा सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. कारागृहातील अंतर्गत सुरक्षा ही कारागृहाची जबाबदारी असल्याने स्मार्ट कार्ड सुविधेचा गैरवापर होणार नाही याची संबंधित कारागृह अधीक्षक यांनी खबरदारी घ्यावी असेही शासन स्तरावर सूचित करण्यात आले आहे.