लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना सातत्याने आलेल्या अडथळ्यांमुळे यंदा राज्यात डिसेंबर व जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी अनुभवायला आली नाही. अद्यापही राज्यात दक्षिणेकडील वाऱ्यांचा जोर असल्याने या महिन्याअखेरीपर्यंत उत्तरेकडील वारे राज्यात जोर पकडण्याची शक्यता दिसून येत नाही. त्यामुळे दरवर्षी प्रजासत्ताक दिनी जाणवणारी थंडी यंदा फारशी जाणवणार नाही. महिन्याअखेरीस ३० जानेवारीला किमान तापमानात घट होऊन सरासरीच्या जवळपास राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात रविवारी सर्वात कमी किमान तापमान जळगाव येथे १२.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.
पूर्व बिहारपासून मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. झारखंड, छत्तीसगड, विदर्भमार्गे हे क्षेत्र मराठवाड्यापर्यंत आहे. त्यामुळे राज्यातील तापमान वाढते राहणार आहे.
पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात हवामान कोरडे राहणार आहे. पुढील चार दिवस किमान तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे.
२८ जानेवारीला विदर्भात पावसाची शक्यता
पूर्व बिहारपासून मराठवाड्यापर्यंत पसरलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भात २८ जानेवारीला काही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.