पुणे : समुद्राच्या किनाऱ्यावर कॅफे चालू करण्याचे आमिष दाखवून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. अधिक माहितीनुसार, ७ सप्टेंबर २०२१ ते २३ फेब्रुवारी २०२२ दरम्यान हा प्रकार घडला. याबाबत नवनीत अशोक कुमार (वय ३१, रा. खराडी) यांनी फिर्याद दिली.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी हे शिक्षणासाठी पुण्यात राहत होते. आरोपी अनंत कुमार जैन (वय ३१, रा. कर्नाटक) आणि सचिन शर्मा हे त्यांच्यासोबत पेईंग गेस्ट म्हणून राहत होते. समुद्राच्या किनाऱ्यावर कॅफे चालू केल्यावर खूप नफा भेटतो असे त्यांनी फिर्यादींना सांगितले.
त्यानंतर विश्वास संपादन करून कॅफेसाठी जागा खरेदी, कॅफेचे बांधकाम, सामान खरेदी करता पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. कॅफे चालू केल्यावर नफा व गुंतवणूक केलेले पैसे परत न करता, फिर्यादीची तब्बल १५ लाख १७ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी अनंत कुमार जैन व सचिन शर्मा या दोन आरोपींवर चंदननगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.