निलेश राऊत-
पुणे : कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने, आता संपूर्ण पुणे शहरच सील करून संचारबंदीची कडक अंमलबजावणी प्रशासनाने सुरू केली आहे. यामुळे कोरोना संसर्गाचा प्रभाव रोखण्यास मोठी मदत होणार असली तरी, पुढील दहा ते पंधरा दिवसात कोरोनाबाधितांच्या यापूर्वीच संपर्कात आलेल्या जवळच्या (क्लोज कॉन्टॅक्टमधील) व्यक्तींनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे मोठ्या प्रमाणात उजेडात येण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे शहर सील केल्यामुळे त्यांच्यापासून इतरांना होणारा संसर्ग रोखण्यास मोठे यश मिळणार आहे.
आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार,तसेच परदेशातील कोरोना संसर्ग वाढीचा काळ लक्षात घेता, पूर्ण संचारबंदीत करण्यात येणाऱ्या विशेष आरोग्य तपासणीत कोरोनाची लागण झालेल्या व्यक्ती मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. सद्यस्थितीला पुणे शहरात पालिकेच्या ८०० तपासणी पथकांकडून प्रत्येक नागरिकाच्या आरोग्य तपासणीचे काम केले जात असून, प्रामुख्याने ज्या भागात अधिक कोरोनाबाधित रूग्ण सापडले. त्या भागात ही तपासणी कसून करण्यात येत आहे. रविवारी रात्रीपर्यंत पुणे महापालिका हद्दीत ६०० हून अधिक कोरोनाबाधित रूग्ण असल्याची नोंद आहे. त्यामुळे या बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची संख्या ही मोठी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.पुणे शहरात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण हे दाटवस्तीच्या भागात म्हणजेच झोपडपट्टी भागात सापडले आहेत. त्यामुळे येथील रूग्णांच्या जवळच्या संपर्कातील (क्लोज कॉनटॅक्ट) व्यक्तींची संख्या मोठी असल्याचे तपासणीमध्ये निदर्शनास आले आहे. अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची लक्षणे लागलीच आढळून येत नाहीत. किंबहुना कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेले अनेक जण स्वत:हून तपासणीसाठी पुढे येत नसल्याचे आढळून आले आहे. परिणामी प्रशासनाकडूनच आता ही तपासणीची कार्यवाही जोमाने होत असून, आजपर्यंत २५ लाख पुणेकरांची तपासणी करण्यात आली आहे.गेल्या दहा दिवसातील रूग्ण वाढीची संख्या व विभाग लक्षात घेता, शहर सील करण्याचा निर्णय हा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठा आशेचा किरण आहे. सील केलेल्या भागातील संशयितांना लागलीच प्रशासनाकडून क्वारंटाईन कक्षात तसेच रूग्णालयांमध्ये खबरदारी म्हणून हलविण्यात येत आहे. तसेच चौदा दिवस या संशयितांना इतरांच्या संपर्कात न येऊ देता, संभाव्य संसर्ग टाळण्याचे नियोजन सुरू आहे.परिणामी कोरोना विषाणूच्या संसगार्ला आपण शहर सील करून अटकाव करीत असलो तरी, पुर्वी कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेले व संसर्ग झालेले उजेडात येण्यास पुढील पंधरा दिवस तरी लागणार आहेत. यानंतर मात्र कोरोना संसर्गचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येण्यास सुरूवात होईल असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे तसेच प्रशासकीय यंत्रणेचे म्हणणे आहे. या सर्वांला आता केवळ नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सोशल डिस्टसिंग ठेवणे गरजेचे आहे.