आळंदी : संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी सोहळ्यात प्रत्येक जण हिरीरीने सहभागी होत असतो. काही माऊलींबरोबर पंढरपूरपर्यंत जातात, तर काही प्रस्थान सोहळ्यात सेवा देऊन आपली माऊलींप्रती श्रद्धा व्यक्त करतात. या सहभागात कोणत्याही प्रकारचा भेद होणार नसला, तरी सुरक्षेच्या कारणास्तव यंदाच्या वारीत सेवेकरीच्या संख्येत काही मर्यादा घालण्यात येणार आहे. पालखी प्रस्थानवेळी माऊलींची पालखी खांद्यावर मिरवत मंदिराबाहेर घेऊन येण्याचा मान मिळावा याकरिता इच्छुक असलेल्या स्थानिक तरुणांवर काही प्रमाणात निर्बंध येणार आहेत. आपल्या खांद्यावर पालखी घेऊन जाण्यासाठी आतुर असलेल्या तरुणांचा पोलीस प्रशासन व देवस्थानने घेतलेल्या निर्णयामुळे पुरता हिरमोड होणार आहे. त्याबाबत नुकत्याच घेण्यात आलेल्या खांदेकऱ्यांच्या बैठकीत हे स्पष्ट झाले आहे. या बैठकीत खांदेकऱ्यांची संख्या मर्यादित ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले व ही संख्या १०० ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. ही संख्या कमी असल्याने उपस्थित खांदेकऱ्यांनी त्याला विरोध केला व संख्या वाढविण्याची मागणी केली असता प्रशासनाने ही खांदेकऱ्यांच्या मतांची कदर करत ही संख्या दोनशे ते अडीचशेच्या दरम्यान ठेवली आहे. मात्र, ही संख्या अपुरी असून, यामुळे तरुणांचा हिरमोड होणार असल्याचे खांदेकऱ्यांचे मत आहे. माऊलींच्या पालखीला खांदा देऊन ती पालखी नाचवत मंदिराबाहेर काढत संपूर्ण ग्रामप्रदक्षिणा घालण्याचे काम हे खांदेकऱ्यांकडे असते, हे अधिकृत पद नसले तरी पालखीला खांदा देणारी म्हणून खांदेकरी अशी या वेळी मुलांची ओळख केली जाते. या खांदेकऱ्यांसाठी प्रशासनाने पासेस उपलब्ध करून दिले असून, या पासेसशिवाय त्यांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (वार्ताहर) माऊलींच्या मंदिरास चारही बाजंूनी दिंड्यांचा वळसा असतो. या दिंड्या पालखीपुढे २० व मागे २७ अशा संख्येने उभ्या असतात. यातील वारकऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यात खांदेकऱ्यांची संख्या मर्यादित न केल्यास खांदेकरी म्हणून असंख्य स्थानिक तरुण मंदिरात दाखल होतात. यामुळे अगोदरच झालेल्या गर्दीत भरच पडते. यामुळेच यंदापासून ही संख्या मर्यादित करण्यात आल्याचे आळंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
माऊलींच्या पालखीस खांदेकऱ्यांची मर्यादा
By admin | Published: June 26, 2016 4:37 AM