यवत : किमान ऊसदराचे, साखरेच्या किमान दराशी कायमस्वरूपी लिंकिग करा तसेच दूध भेसळ व दराबाबत तातडीने निर्णय घ्या, अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी विधानसभेत केली. सभागृहात सुरू असलेल्या २९३ अन्वये प्रस्तावरील चर्चेवेळी ते बोलत होते.यावेळी आमदार अॅड. कुल म्हणाले, की साखर व दूध हा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय राहिलेला आहे. साखरेच्याबाबतीत आपण उसाचा किमान दर ठरवला आहे, परंतु उसाचा किमान दर ठरवत असताना कारखानदारांना आवश्यक असणारा साखरेचा किमान दरदेखील ठरवला जात नव्हता. मागील पाच सहा वर्षांच्या काळात साखर कारखानदारी अतिशय अडचणीच्या काळातून जात आहे. यामधून मार्ग काढण्यासाठी उशिरा का होईना राज्य शासनाने साखरेला किमान बाजारभाव देण्याचा कायदा आणला व त्याची अंमलबजावणी केली. पुढील वर्षी प्रचंड उसाची उपलब्धता आहे. अशा परिस्थितीमध्ये किमान ऊसदराचे लिंकिंग किमान साखरेच्या दराशी केले तर हा प्रश्न मार्गी लागेल. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्याची विनंती त्यांनी यावेळी केली. इथेनॉलला ५० रुपयांपर्यंतदर देण्यासंदर्भात केंद्रशासन भूमिका घेत आहे तो निर्णय झाला व किमान ऊस दराचे किमान साखरेच्यादराशी कायमस्वरूपी लिंकिंग केलेतर हा प्रश्न कायमस्वरूपी सुटूशकतो, असे मत त्यांनी यावेळीव्यक्त केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुधाच्याबाबतीत निर्णय घेतलेले आहेत. परंतु दुधामध्ये १५ ते २० टक्के भेसळ केली जाते, अशी चर्चा संपूर्ण राज्यात आहे. यावर्षी तर नवीनच चित्र निर्माण झाले आहे. दुधाला दर नाही म्हणून कोणताही शेतकरी नवीन जनावर घेत नाही, तरीदेखील दुधाचा महापूर आला आहे. हा महापूर नक्की कोठून आला, हे शोधण्याची आवश्यकता असून दूध भेसळीमुळे लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे मंत्री गिरीश बापट व मंत्री महादेव जानकर यांनी यामध्ये लक्ष देऊन निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याची मागणी त्यांनी यावेळी केली.- राहुल कुल, आमदार
ऊसदराचे साखरेच्या दराशी लिंकिंग करा - राहुल कुल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 1:42 AM