पुणे : मतदार कार्ड आधारशी जोडणे ऐच्छिक असले तरी प्रशासनातर्फे घरोघरी जाऊन यावर जनजागृती केली जात आहे. त्यामुळे एकाच मतदाराचे अनेक ठिकाणी नाव असल्यास ते शोधणे सोपे होणार आहे. या मोहिमेत आता जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर संकेतस्थळात आवश्यक ते बदल झाल्यानंतर १ ऑगस्टपासून ही मोहीम सुरू होणार आहे.
जिल्ह्यात ८१ लाख ५८ हजार मतदार
मतदार नोंदणीची मोहीम कायमस्वरूपी सुरू असली तरी दोन वेळा ती अद्ययावत केली जाते. ऑक्टोबरमध्ये प्रारूप मतदार यादी केली जाते. त्यानंतर जानेवारीत त्यात आणखी मतदार वाढलेले असल्यास त्याला जानेवारीमध्ये अंतिम स्वरूप दिले जाते. याला केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता असते. त्यानुसार जानेवारीमध्ये अंतिम झालेल्या यादीप्रमाणे जिल्ह्यात सध्या ८१ लाख ५८ हजार ५३९ मतदार आहेेत.
बोगस मतदार काढले जाणार
केंद्र सरकारने मतदार कार्ड आधारशी जोडणे बंधनकारक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मात्र, अनेक मतदारांचे नाव एकापेक्षा अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे अनेकांनी दोन मतदार मिळवले आहेत. असे दुबार नावे वगळण्यासाठी मतदार कार्डाला आधार कार्डाशी जोडण्यात येणार आहे. दोन ठिकाणी मतदान असल्याने अनेकदा बोगस मतदानाची भीती वाढते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि ज्यांच्या नावावर एकापेक्षा अधिकची निवडणूक ओळखपत्रे आहेत, त्यांची शहानिशा करण्यासाठी, त्यांची ओळख पटविण्यासाठी सरकारने हा उपक्रम हाती घेतला आहे. यासंबंधीची एक अधिसूचना नुकतीच सरकारने जाहीर केली आहे. या निर्णयामुळे ज्या मतदाराकडे एकापेक्षा जास्त कार्ड असेल, त्यांचे एक मतदान ओळखपत्र रद्द करण्यात येणार आहे.
योग्य बदलानंतर अंमलबजावणी
यासाठी आता जिल्हा प्रशासनही सज्ज झाले असून, त्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येत्या आठवडाभरात हे प्रशिक्षण होणार असून, त्यानंतर १ ऑगस्टपासून या उपक्रमाला सुरुवात होणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी दिली. केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत योग्य ते बदल करून संकेतस्थळ अद्ययावत करणार आहे. त्यानंतर त्याची अंमलबजावणी राज्य निवडणूक आयोग करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.