पिंपरी : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर शनिवारपासून महामार्गापासून पाचशे मीटर अंतराच्या आत असलेले वाईन्स शॉप्स आणि रेस्टॉरंट्स अॅण्ड बार बंद करण्यात आले. त्याचा फटका जवळपास ८० टक्के हॉटेल्स आणि मद्य विक्रेत्यांना बसला. परिणामी मद्य विक्री सुरु असलेल्या तुरळक ठिकाणी मद्यप्रेमींची गर्दी उसळली होती. सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगतच्या वाईन्स शॉप्स आणि बार बंद करण्याचा निर्णय दिला आहे. शहरात महामार्गालगत १९५० बार असून, जवळपास पाचशे वाईन्स शॉप्स आहेत. शहरात पुणे-मुंबई महामार्ग, पुणे-नाशिक, मुंबई-बेंगळुरु महामार्ग आणि नगर रस्ता असे महामार्ग जातात. या निर्णयाचा फटका शहर हद्दीतून जाणाऱ्या महामार्गालगतच्या वाईन्सशॉप्स आणि बारला देखील बसला आहे. पुणे रेस्टॉरंट्स हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले, शहर हद्दीतून जाणारे महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने महानगरपालिकेकडे हस्तांतरीत केले आहेत. येथील वाईन्स आणि बार चालकही महापालिकेकडे कर भरतात. मात्र, महापालिकेने रस्ते हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण न केल्याने येथील वाईन्स आणि बार चालकांवर कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे शहरातील ८० टक्के बार आणि वाईन्स शॉप चालकांना फटका बसला. इंडियन ग्रेप असोसिएशन बोर्डाचे माजी अध्यक्ष, जगदीश होळकर म्हणाले, हॉटेल्सच्या माध्यमातून वाईन्स अथवा इतर पेय घेणाऱ्यांची संख्या ७० टक्के इतकी आहे. तर केवळ तीस टक्के व्यक्ती वाईन्स शॉप्समधून खरेदी करतात. या निर्णयामुळे राज्यातील ८० टक्के वाईन्स आणि बार बंद होते. याचा फटका वाईन या आरोग्यदायी पेयाला देखील बसला आहे. खरेतर वाईन आणि इतर मद्य असा फरक सरकारने केला पाहीजे. याबाबत सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा.(प्रतिनिधी)
मद्यदुकानांना लागले अखेर कुलूप
By admin | Published: April 02, 2017 2:49 AM