लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : डीएसके प्रकरणातील गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेऊन जप्त न केलेल्या १९ मालमत्तांची अधिसूचना राजपत्रात (गॅझेट) प्रसिद्ध करावी, अशी विनंती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गृह विभागाच्या प्रधान सचिवांकडे पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे या अधिसूचनेनंतर या मालमत्ता जप्तीला वेग येणार आहे.
डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेऊन त्यांच्या ३३५ मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही सुमारे २० मालमत्ता जप्त करण्यात आल्या नव्हत्या. याबाबतची यादी गुंतवणूकदारांनी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला देण्यात आली. मात्र, यावर कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर मावळचे तत्कालीन प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी या मालमत्तांच्या जप्तीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली होती. त्यानंतर देशमुख यांनी गृह विभागाच्या प्रधान सचिवांना या मालमत्ता जप्तीबाबत राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करावी, अशी विनंती केली.