पुणे : कोरोना आपत्तीत पुणे महापालिकेच्या विविध खात्यांकडून कलम ६७ (३ क) अन्वये खरेदी करण्यात आलेल्या साधन-सामुग्री व ‘सीएसआर’ फंडातून मिळालेल्या साहित्यांची मदतीची माहिती संकलित करून त्याचा अहवाल १२ जानेवारीपर्यंत भांडार विभागाकडे सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांनी दिले आहेत़
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायोजनेंतर्गत महापालिका आयुक्तांच्या विशेषाधिकारात कोट्यवधी रूपयांची साधन-सामुग्री गेल्या दहा महिन्यात खरेदी करण्यात आली आहे़ या काळात विविध स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती व आस्थापनांनी महापालिकेला ‘सीएसआर’ फंडातून विविध प्रकारचे साहित्य व मदत दिली आहे़ सद्यस्थितीला कोरोना आपत्ती पुरेशी नियंत्रणात आल्याने, महापालिकेची विविध कामगार निवारा केंद्र, क्वारंटाईन सेंटर, कोविड केअर सेंटर बहुतांशी प्रमाणात बंद झाले आहेत़
या सर्व ठिकाणी विविध मार्गांनी उपलब्ध झालेल्या सर्व साहित्य / सामुग्रीची वर्गवारीनुसार यादी तयार करून, सदर साहित्य सामुग्री जपून ठेवावी व याकरिता आप-आपल्या खात्यातील जबाबदार अधिकारी अथवा कर्मचारी यांची नियुक्ती करावी असे या आदेशात नमुद करण्यात आले आहे़
-------------
पुनर्वापरासाठी यादी भांडार विभागाकडे द्यावी
कोरोना आपत्त्तीत खरेदी केलेली अथवा मिळालेली साधन-सामुग्री यांची यादी तयार करून त्याचा अहवाल महापालिकेच्या भांडार विभागाकडे प्राप्त झाल्यास, या सर्व साधन-सामुग्रीचा पुनर्वापर होऊ शकतो़ त्याअुनषंगाने ही माहिती मागविण्यात आली असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांनी सांगितले़
---------------------------------