पुणे : शहरात वाहतुकीच्या नियमभंग करणाऱ्यांचे प्रमाण मोठे असून अशा नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. शहरात सर्वाधिक वेळा वाहतूक नियमांचे भंग करणाऱ्या टॉप १०० वाहनचालकांची यादी वाहतूक पोलिसांनी जाहीर केली आहे. त्यात बिबवेवाडी येथे राहणाऱ्या एका वाहनचालकाने १०८ वेळा नियमभंग केला असून त्याच्यावर ४२ हजार ३०० रुपयांच्या दंडाची कारवाई केली आहे. तर एका वाहनचालकावर ७० वेळा नियमभंग केल्याबद्दल सर्वाधिक ७० हजार रुपये दंड ठोठावला आहे. तर या १०० जणांच्या यादीतील सर्वात शेवटच्या क्रमांकावर असलेल्या वाहनचालकाने ४४ वेळा नियमभंग केला आहे.वाहतूक पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ई-चलन यंत्राच्या माध्यमातून कारवाई सुरु केली आहे. कारवाई केल्यानंतर नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाला मोबाइलवर संदेश पाठविला जातो. त्याने केलेला नियमभंग आणि दंडाच्या रक्कमेची माहिती दिली जाते. दंडाची रक्कम ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याची सुविधा वाहतूक पोलिसांनी उपलब्ध करुन दिली आहे. अनेक वाहनचालक दंडाची रक्कम जमा करण्यास टाळाटाळ करत आहेत. वाहनचालकांनी वेबसाईट उघडल्यानंतर आपला वाहन क्रमांक टाकल्यास आपल्या वाहनांवर प्रलंबित असलेल्या केसेसची सविस्तर माहिती दिसते. त्यामध्ये पीटीपीसीएचएम व पीएनसीसीएम म्हणजे ई-चलन मशिनद्वारे कारवाई झाली आहे, असे समजावे. या कारवाईमध्ये केलेल्या केसेसमध्ये वाहनचालकास त्याचा फोटो पहायला मिळत नाही व ज्यांना कारवाई मान्य नाही, ते न्यायालयात दाद मागू शकतात. तसेच पीएनसीसीसी म्हणजे सीसीटीव्ही मार्फत झालेली कारवाई आहे, असे समजावे. यामध्ये आपल्याला सीसीटीव्ही मार्फत काढलेले फोटो पुरावा म्हणून पहावयास मिळेल़ या सबंधात काही तक्रार असल्यास पोलीस निरीक्षक, मल्टीमीडिया सेल, वाहतूक शाखा कार्यालय यांच्याकडून अर्ज स्वीकारुन समाधान केले जाईल. थकीत दंड वसूल करण्यासाठी पोलिसांकडून वेळोवेळी मोहिम राबविण्यात आली असली तरी काही जण दंड जमा करण्यास टाळाटाळ करत आहेत. सर्वाधिक वेळा नियमभंग करणारे तसेत थकीत दंडाची रक्कम जमा न करणाऱ्या वाहनचालकांची यादी वाहतूक पोलिसांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे तसेच पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. --येथे तपासा ऑनलाइन दंड वाहतूक पोलिसांनी केलेला दंड तपासण्यासाठी https://trfficech.gov या मोबाईल अॅपवर माहिती तपासता येणार आहे. ही माहिती तपासण्यासाठी वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि इंजिन क्रमांक किंवा चॅसिस क्रमांकाची शेवटचे चार आकडे गरजेचे असतात.