पुणे : वेगळे राहण्याच्या कारणावरून सुनेकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून सासूने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी सुनेसह तिच्या आईवडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ७ जानेवारी रोजी घडला होता. मंगल भाऊसाहेब थोपटे (वय ५२, रा. गणेशनगर, बोपखेल) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी प्रिया प्रसाद थोपटे, प्रकाश पंढरीनाथ घुले, अनिता प्रकाश घुले, राजू पंढरीनाथ घुले, बकुळाबाई पंढरीनाथ घुले (सर्व रा. गणेशनगर, बोपखेल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुलगी शारदा राहुल मारणे (वय ३२, रा. फुगेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. मंगलबाई यांचा मुलगा प्रसाद हा राज्य राखीव पोलीस दलामध्ये नोकरीस आहे. याच्याशी आरोपी प्रियाचे १८ मे २०१० रोजी लग्न झाले होते. त्यांच्यामध्ये सतत कौटुंबिक वाद होत असत. मंगलबार्इंपासून वेगळे राहण्याची प्रिया कायम मागणी करत होती. या कारणावरून त्यांच्यामध्ये भांडणे झाली होती. परंतु, प्रसाद यांनी वेगळे राहण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या प्रियाने माहेरच्या व्यक्तींसोबत मिळून मंगलबाई आणि प्रसादला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली होती. त्यांच्याविरुद्ध खोटा फौजदारी गुन्हा दाखल करण्याची, तसेच प्रसाद आणि त्यांची बहीण मोहिनी यांची पोलीस दलातील नोकरी घालवण्याची धमकी देत होती. या सततच्या त्रासाला कंटाळल्यामुळे मंगलबाई यांनी पाषाण येथील निरंजन कॉम्प्लेक्समध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
सुनेच्या जाचाला कंटाळून सासूची आत्महत्या
By admin | Published: February 14, 2015 3:06 AM