पुणे : साहित्यिक कलावंत संमेलन २४ आणि २५ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगणार आहे. ज्येष्ठ मराठी भाषा अभ्यासक डॉ. निशिकांत मिरजकर संमेलनाध्यक्षपद भूषविणार आहेत. तर यंदा ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक आणि ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांना वाग्यज्ञे साहित्य व कलागौरव पुरस्काराने गौरवले जाणार आहे. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित संमेलनाचे उद्घाटन सकाळी १०.३० वाजता सिंबायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी संमेलनाध्यक्ष डॉ. निशिकांत मिरजकर, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मुक्ता टिळक आणि सरहद, पुणेचे संस्थापक संजय नहार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष आणि या संमेलनाचे प्रमुख संयोजक दिलीप बराटे यांनी दिली. वि. दा. पिंगळे उपस्थित होते.संमेलनात चित्रप्रदर्शन, ग्रंथप्रदर्शन, विंदादर्शन, कविसंमेलन, जीवनगाणे, कथाकथन आदी कार्यक्रम होणार आहेत. दुपारी ४ वाजता ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ या विषयावरील परिसंवादाचे अध्यक्षस्थान माजी संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस भूषविणार आहेत. या परिसंवादात तुषार गांधी, प्रा. डॉ. शशिकला राय आणि संजय आवटे सहभागी होणार आहेत. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता ‘सामाजिक परिवर्तन आणि आजचे मराठी साहित्य’ या विषयावर उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. यामध्ये राजन खान, इंदुमती जोंधळे आणि विजय बाविस्कर भाग घेणार आहेत. दुपारी २ वाजता ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांची प्रकट मुलाखत होईल.दुपारी ४ वाजता गिरीश ओक आणि अशोक नायगावकर यांना डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते वाग्यज्ञे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. विविध साहित्यिक आणि कलावंतांचा सहभाग असलेल्या आणि बहुरंगी कार्यक्रमांची पर्वणी असलेल्या या संमेलनाचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही बराटे यांनी सांगितले.
साहित्यिक कलावंत संमेलन २४, २५ डिसेंबरला रंगणार पुण्यात; संमेलनाध्यक्षपदी निशिकांत मिरजकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:47 PM
साहित्यिक कलावंत संमेलन २४ आणि २५ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगणार आहे. ज्येष्ठ मराठी भाषा अभ्यासक डॉ. निशिकांत मिरजकर संमेलनाध्यक्षपद भूषविणार आहेत.
ठळक मुद्देसिंबायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते होणार संमेलनाचे उद्घाटनसंमेलनात चित्रप्रदर्शन, ग्रंथप्रदर्शन, विंदादर्शन, कविसंमेलन, जीवनगाणे, कथाकथन आदी कार्यक्रम