पुणे : संत नामदेव यांची कर्मभूमी घुमान येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संत साहित्याचा समर्पित अभ्यासकच योग्य उमेदवार ठरतो. मोरे यांनी सबंध आयुष्यच संत साहित्यासाठी वाहिले आहे, अशी भूमिका घेत ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी माघार घेतली, तर दुसरे इच्छुक रामचंद्र देखणे यांनीही बिनविरोध निवडणुकीची भूमिका मांडली आहे. मात्र, अशोक कामत लढण्यावर ठाम असल्याने बिनविरोधची अद्याप फक्त चर्चाच सुरूच आहे. ज्येष्ठ साहित्यिक सबनीस यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून अर्ज भरण्यापूर्वीच मोरे यांना पाठिंबा जाहीर केला. पत्रकार परिदषेत ते म्हणाले, ‘‘नामदेवांच्या संतत्वाने शीख, मुस्लिम, हिंदूंसह सर्व जातिधर्माच्या एकात्मतेचा अनुबंध जपला. वर्तमान राष्ट्रीय एकात्मतेचे हे सांस्कृतिक अधिष्ठान मला महत्त्वाचे वाटते. या पार्श्वभूमीवर घुमानच्या संमेलनाध्यक्षपदाची निवड बिनविरोध व्हावी, अशी माझी धारणा आहे. या निमित्ताने मराठी विश्वात बिनविरोध अध्यक्ष निवडण्याचा नवा इतिहास घडवावा. मोरे जर उभे राहणार असतील तर मी माघार घेईल, असे मी मागेच जाहीर केले होते. त्याप्रमाणे आता फक्त कृती करत आहे. असाच सांस्कृतिक विवेक इतरांनीही दाखवावा व नवा इतिहास घडवावा.’’ अन्य उमेदवारांना या आवाहनाचे पत्र वैयक्तिक पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोरे म्हणाले, ‘‘सबनीसांनी स्वत:हून पाठिंबा दाखविला. अपवादात्मक आणि आश्चर्यचकित करणारा त्यांचा निर्णय आहे. परंतु यामागची त्यांची भूमिका अत्यंत स्पष्ट व पटणारी आहे. परिस्थिती, काळाची मागणी आणि स्थळाची गरज ओळखून संमेलनाध्यक्ष असावा, हा तर्क पटणारा आहे. ही राजकीय सत्तेची निवडणूक नसून साहित्याची आहे. त्यामुळे यात फरक असणे आवश्यक आहे.’’ अध्यक्षपदासाठी चर्चेतील डॉ. रामचंद्र देखणे यांनीही बिनविरोध निवडणुकीची इच्छा व्यक्त केली आहे. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, ‘‘ संत साहित्याचे अभ्यासक आणि संत तुकाराममहाराज यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक घुमानपासून बिनविरोध व्हावी. संमेलनाची घोषणा झाली, त्या वेळी मी पंढरपूर वारीत होतो. मी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे, असे मी कधीही जाहीर केले नव्हते. मी ‘ज्ञानोबा-तुकोबा’ धर्म मानतो, तर ‘वारकरी संप्रदाय’ आनंद मानतो. (प्रतिनिधी)
साहित्य संमेलनाध्यक्ष बिनविरोधच्या दिशेने!
By admin | Published: August 29, 2014 4:30 AM