पुणे : प्रसिद्ध दिवंगत लेखक शिवाजी सावंत यांच्या मृत्यूंजय, छावा आणि युगंधर या तीन पुस्तकांचे मालकी हक्क लवाद न्यायाधिकरणाने कॉन्टिनेन्टल प्रकाशनाला दिले आहे. त्यामुळे ही तीनही पुस्तके लवकरच वेगळ्या स्वरुपात वाचकांसमोर आणली जाणार आहेत. तसेच वारसदारांशी संवाद साधून शिवाजी सावंत यांचे लेखन ई-पुस्तकांच्या स्वरुपात आणण्याचाही प्रयत्न केला जाईल, असे कॉन्टिनेन्टल प्रकाशनचे संचालक ॠतूपर्ण कुलकर्णी व अमृता कुलकर्णी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.साहित्यासारख्या संवेदनशील क्षेत्रात नैतिकता व कायदा बाजूला ठेवून मेहता पब्लिशिंग हाऊसने शिवाजी सावंत यांच्या तीन पुस्तकांच्या प्रकाशनाचे अधिकार मिळविण्याचा प्रयत्न केला. त्या विरोधात कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने कायदेशीररित्या दिलेला लढा यशस्वी झाला. त्यामुळे मृत्यूंजय, छावा आणि युगंधर या तीन पुस्तकांचे मालकी हक्क पुन्हा कॅन्टिनेन्टल प्रकाशनाकडे आले. यावर ॠतूपर्ण व अमृता कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका सांगितली. या प्रसंगी उत्कर्ष प्रकाशनाचे संस्थापक संचालक सु. वा. जोशी, प्रकाशनाच्या संपादिका अंजली जोशी आदी उपस्थित होते.ॠतुपर्ण जोशी म्हणाले, लेखकाच्या मृत्यूनंतर पुढे ६० वर्ष पूर्वीच्या प्रकाशकांना पुस्तकाचे प्रकाशन करता येते. परंतु, शिवाजी सावंत यांच्या वारसदारांची दिशाभूल करून मेहता प्रकाशनाने प्रकाशनाचे हक्क स्वत: कडे घेतले. दरम्यानच्या काळात पायरेडेट पुस्तके बाजारात आली होती. मात्र, हा ऐतिहासिक ठेवा कायदेशीररित्या पुन्हा आमच्याकडे आला याचा आनंद आहे.अमृता कुलकर्णी म्हणाल्या, कॉन्टिनेन्टलने २०१२पासून या पुस्तकांच्या आवृत्या प्रकाशित केल्या नव्हत्या. पुढील वर्षी मोठा टाईप आणि दर्जेदार कागदावर वेगळ्या स्वरुपात या तीनही पुस्तकांचे प्रकाशन केले जाईल. त्याचप्रमाणे या प्रकरणातून दुसऱ्याच्या बागेतील फुले उपटून आपल्या बागेत लावून; आपली बाग सुशोभीत करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्याच प्रकाशनाने केला, अशी टीका प्रकाशकांकडून केली जात असल्याचेही कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.
शिवाजी सावंत यांचे लेखन येणार ई-पुस्तकांच्या स्वरुपात; ‘कॉन्टिनेन्टल’ची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 5:16 PM
प्रसिद्ध दिवंगत लेखक शिवाजी सावंत यांच्या मृत्यूंजय, छावा आणि युगंधर या तीन पुस्तकांचे मालकी हक्क लवाद न्यायाधिकरणाने कॉन्टिनेन्टल प्रकाशनाला दिले आहे.
ठळक मुद्देकॉन्टिनेन्टल प्रकाशनाने कायदेशीररित्या दिलेला लढा यशस्वी मृत्यूंजय, छावा आणि युगंधर या तीन पुस्तकांचे मालकी हक्क पुन्हा कॅन्टिनेन्टल प्रकाशनाकडे