पुणे : शिक्षण मंडळाच्या २०१६-१७ चे शैक्षणिक साहित्य विहीत मुदतीत न देता साहित्य देण्यास उशीर करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची शिफारसही महापालिका आयुक्तांकडे करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळ अध्यक्षा वासंती काकडे यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. शिक्षण मंडळाच्या साहित्य खरेदी दिरंगाई प्रकरणी महापालिकेने केलेल्या तपासणी अहवालानुसार, संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. या साहित्य खरेदीत दिरंगाई असल्याची बाब लोकमतने साहित्य खरेदीत अनियमितताच या वृत्ताद्वारे उजेडात आणली होती.काकडे म्हणाल्या की, शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील तब्बल १ लाख मुले शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांच्या शैक्षणिक दर्जा उंचाविणे तसेच शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी गेल्या वर्षभरात मंडळाकडून विविध उपक्रम राबविले जात आहे. राज्य शासनाने मंडळाचे आर्थिक अधिकार काढून घेतले असून केवळ १0 लाखांपर्यंतची खरेदी मंडळास करता येते. त्यामुळे संपूर्ण साहित्य खरेदीप्रक्रिया महापालिका आयुक्तांच्या देखरेखीखालीच राबविली जाते. त्यानंतरही अशा प्रकारे दिरंगाई होत असल्याने शिक्षण मंडळाबाबत चुकीची प्रतिमा तयार झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन निविदाप्रक्रियेत महापालिका प्रशासनाकडून सुसूत्रता आणणे आवश्यक आहे.
साहित्य उशिरा देणाऱ्यांना काळ्या यादीत टाकणार
By admin | Published: August 12, 2016 1:18 AM