पुणे : कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची आम्हाला जाणीव होती. मात्र, ही लाट त्सुनामीप्रमाणे येईल, असे वाटले नव्हते. कोरोनावर शंभर टक्के इलाज करणारे औषध अद्याप जगाला मिळाले नाही. त्यामुळे थोडीशी बेफिकिरी ही पुढच्या लाटेला आमंत्रण असेल. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी चतु:सूत्रीचा वापर करावा, असे मत माजी सनदी अधिकारी व मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ‘कोविड १९ लढाई’ या विषयावर आयोजित ऑनलाइन व्याख्यानात डॉ. दीपक म्हैसेकर बोलत होते. या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, आयसरचे प्राध्यापक डॉ. शशिधरा, रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अविनाश कुंभार आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोना व्हायरसपासून बचावासाठी मास्क वापरणे, हात धुणे, शारीरिक अंतर पाळणे आणि लसीकरण करणे या गोष्टी केल्यास आपला त्यापासून बचाव होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ही चतुःसूत्री पाळावी लागणार आहे. तसेच अद्यापही आपण सांघिक प्रतिकारशक्तीकडे वाटचाल केलेली नाही. त्यासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे. लसीकरण करूनही कोरोना होतोय ही बाब जरी खरी असली ते प्रमाण नगण्य आहे. लसीकरणमुळे प्रतिकारशक्ती वाढली असल्याने कोरोना झाला तरी तो जीवावर बेतण्याचे प्रमाण कमी असेल. त्यामुळे जशी लस उपलब्ध होईल, तशी ती घेणे गरजेचे आहे.
डॉ. नितीन करमळकर म्हणाले, डॉ. म्हैसेकर यांनी कोरोनाच्या सुरुवातीपासून हा लढा जवळून अनुभवला असून त्याचा अभ्यास केला आहे. त्यांनी सांगितलेली ही माहिती विद्यापीठाबरोबरच समाजालाही अत्यंत मार्गदर्शक आहे.
–-------