पुणे : कोंढव्यातील एका ८ वर्षाच्या मुलीचा तिची सावत्र आई छळ करीत होती. तिला जेवायला न देता मारहाण करुन हकलून दिले होते. त्यामुळे ती बाहेर फिरत होती. रात्रीच्या वेळी तिने एका घरात पिण्यासाठी पाणी मागितले. तेव्हा घरातील माऊलीने तिची चौकशी केल्यावर सावत्र आई छळ करीत असल्याचे समजले. यावेळी या माऊलीची लहान मुलगी तेथेच होती. तिला चाईल्ड हेल्पलाईनचा नंबर माहिती होता. तिने दुसर्या दिवशी चाईल्ड हेल्प लाईनला फोन करुन या मुलीची माहिती दिली. हा कॉल पुण्यातील ज्ञानदेवी चाईल्ड हेल्पलाईनकडे आला. त्यांनी कोंढवापोलिसांच्या मदतीने भाग्योदयनगर येथील या मुलीचे घर शोधून काढले. तिच्या आई वडिलांना विचारणा केली. पण, ही मुलगी सावत्र आईच्या त्रासाला इतकी कंटाळली होती. की तिने त्यांच्याबरोबर राहण्यास नकार दिला. मुलीला सुरक्षितपणे ठेवण्यात आले आहे. अर्पणा मोडक यांच्या फिर्यादीवरुन कोंढवापोलिसांनी सावत्र आई व वडील यांच्यावर गुुन्हा दाखल केला आहे.
दुसर्या एका घटनेत सावत्र वडिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावत्र वडिलांकडून ११ वर्षाच्या मुलीला आंब्याच्या पेटीच्या फळीने मारहाण करुन तिला जखमी केल्याचे फोटो एका नागरिकांने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या
ट्विटर अकाऊंटवर टाकण्यात आले होते. पोलीस आयुक्तांनी त्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते. वडील हे गेल्या ६ महिन्यांपासून आपल्या सावत्र मुलीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत होता. वेळोवेळी जेवण न देता उपाशी ठेवत होता. दोन्ही घटनांमध्ये ज्युवेनाईल जस्टीस अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ..........१०९८ हेल्पलाईन नंबर वर द्या माहितीअल्पवयीन मुलांचा छळ होत असेल. त्यांना कामाला जुंपले जात असेल तर त्यांच्यावरील अन्याय दूर करुन त्यांना मदत करण्यासाठी देशभरात चाईल्ड हेल्प लाईन सुरु करण्यात आली आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये स्वयंसेवी संस्था त्यांचे काम पहातात. पुण्यात ज्ञानदेवी हेल्पलाईन संस्था हे काम पहाते. लहान मुलांवर अन्याय, अत्याचार होत असल्याचे दिसताच 1098 या हेल्पलाईनवर संपर्क साधून माहिती द्यावी.