सहकारनगर : ‘हेल्मेट वापरल्याने जर नागरिकांचा जीव वाचत असेल तर त्यासाठी नागरिकांनी अनावश्यक विरोध का करावा?’ हे वाक्य आहे अमित उरसळ या सुसंस्कृत पुणेकराचे! अमित उरसळ हे शिवदर्शन पर्वती या भागात राहणारे बीई इलेक्ट्रिकल आणि चार्टर्ड इंजिन असे उच्चशिक्षित आहेत. त्यांचा व्यवसाय इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर व सेफ्टी आणि एनर्जी आॅडिटर असा आहे. काही दिवसांपूर्वी ते दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये आपल्या कामानिमित्त आले होते. त्या वेळेस दत्तवाडी पोलीस स्टेशनमधील पोलीस बांधवाचा वाढदिवस असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी त्यानिमित्त पुष्पगुच्छ देण्याऐवजी पोलीस वाहन चालविताना ते सुरक्षित राहावे म्हणून त्याला हेल्मेट भेट दिले व जनतेमध्ये हेल्मेट वापरण्याबद्दल जनजागृती निर्माण करायची असल्यास प्रथम आपण स्वत: हेल्मेट वापरले पाहिजे, हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल अमित उरसळ यांनी घेतली आणि स्वत: एक हेल्मेट विकत घेऊन आपली लहान मुलगी श्रेया अमित उरसळ (वय ९) हिच्या सोबत येऊन त्यांनी हे हेल्मेट देविदास घेवारे यांना सुपूर्द केले व माझा हेल्मेट वापरण्याच्या मोहिमेला उत्स्फूर्त पाठिंबा आहे, असे सांगितले.पुणे पोलीस आयुक्त यांनी वाहनचालकांनी हेल्मेट वापरण्याबाबत सुरू केलेल्या मोहिमेला हा एक सकारात्मक प्रतिसाद असल्याचे दिसून आले.माझा खारीचा वाटाते म्हणाले, ‘माझी मुलगी ९ वर्षांची आहे. ती सध्या मुक्तांगणमध्ये इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेत आहे. भविष्यात तीसुद्धा गाडी चालविणार आहे आणि तिच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरणे किती आवश्यक आहे, हे तिला लहानपणापासून समजावून सांगायचे आहे व पोलीस जर हेल्मेट घालण्यास सांगत आहेत तर त्यामागे जनतेच्या जीविताचे रक्षण व्हावे, हा त्यामागे उद्देश असेल तर विनाकारण त्याला विरोध होऊ नये. देविदास घेवारे यांनी जनतेमध्ये हेल्मेट वापरासंबंधी जनतेमध्ये प्रबोधन व्हावे, याकरिता स्वत: प्रथम आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त हेल्मेट भेट दिले. ही त्यांची जनहितार्थ संकल्पना मला अतिशय आवडली म्हणून मीसुद्धा या मोहिमेत माझा खारीचा वाटा उचलला आहे.
हेल्मेट मोहिमेत एका लहान मुलीचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 2:34 AM