पुणे : बाप्पा घरात येणार असल्याने शुक्रवारी रात्रीपासूनच सजावट करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी सकाळपासून नवे कपडे घालून बाप्पांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. घरामध्ये गृहिणींनी गोड-धाेडाचा नैवेद्य बनविला होता. लहान-थोरापासून सर्वांनी बाप्पांचे स्वागत करून आनंद साजरा केला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा गजर करत घराघरात ऐकायला मिळाला.
दरवर्षीप्रमाणे यंदा लाडक्या गणरायाचे स्वागतासाठी शनिवारी सकाळपासून घरोघरी जय्यत तयारी सुरू केली होती. गेल्या चार-पाच दिवसांमध्ये काम सांभाळून खरेदी, सजावटीसह बाप्पांच्या नैवेद्यात वैविधता आणण्यासाठी गृहिणींनी कंबर कसली होती. घरातील साफसफाईनंतर शुक्रवारी (दि.६) रात्रीपासून त्यांचा मोर्चा सजावटीकडे वळला होता. घरातील पुरुष मंडळींसोबत चिमुकल्यांनी देखील सजावटीचा भार उचलला होता. तर सुगरणींनी बाप्पांच्या नैवेद्याचा भार आपल्या खांद्यावर घेतला. उकडीच्या मोदकांबरोबरच विविध गोडधोडीचा नैवेद्य तयार केला होता.
घरामध्ये छानशा ठिकाणी भाविकांनी बाप्पांसाठी सजावटी केल्या. घराघरात फुलांच्या माळा, विजेच्या माळा आणि आकर्षक मखर करण्यात आली आहेत. काहींच्या घरात दीड दिवस, पाच तर काहींच्याकडे दहा दिवसांचे गणराय असणार आहेत.
थर्माकोलचा वापर कमी !
गेल्या काही वर्षांपासून बाप्पांच्या सजावटीसाठी थर्माकोलचा वापर अधिक होत असे. पण त्यावर बंदी असल्याने आता त्याचा वापर हळूहळू कमी होत आहे. यंदा तर बऱ्यापैकी अनेकांनी पर्यावरणपूरक गणपतीचा उपक्रम राबविला.
घरामध्ये बाप्पांचे आगमन होणार म्हटलं की, आनंदीआनंद होतो. बाप्पा हे घरातील एक सदस्यच असतात. दहा दिवस खूप आनंदाचे, चैतन्याचे आणि उत्साहाचे जातात. विघ्नहर्ता बाप्पा आल्याने घरामध्ये मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे -शीतल चव्हाण, गृहिणी