पुणे : कुणी उन्हाच्या तडाख्यात नको म्हणून सकाळीच येऊन गेले तर कुणी नाष्टा, चहा पाणी घेवून आले... कुणाला रांगेत उभे राहावे लागले तर कुणाला दुसऱ्या -तिसऱ्या मजल्यावर चालत जावे लागले. लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. त्यात महाराष्ट्रातील पुणे , बारामती, माढा, सांगली , सातारा, अशा चौदा जागांचा समावेश आहे. पुण्याच्या जागेसाठी मंगळवारी विविध मतदान केंद्रावर मतदानासाठी सर्वच स्तरावरुन मतदार राजा सरसावल्याचा पाहायला मिळाले. मतदाराराजामध्ये महापौर मुक्ता टिळक , विद्यमान खासदार अनिल शिरोळे, पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव , जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, संगीतकार व दिग्दर्शक डॉ, सलील कुलकर्णी, मुळशी पॅटर्न लेखक , दिग्दर्शक प्रविण तरडे, अभिनेत्री भार्गवी चिरमुले, श्रुती मराठे, अभिनेता अमेय वाघ, अभिनेत्री मुक्ता बर्वे, गायिका आर्या आंबेकर, ज्येष्ठ साहित्यिक द.मा.मिरासदार, शिवसेनेच्या प्रवक्त्या व आमदार नीलम गोऱ्हे , पर्वती विधानसभा मतदारसंघ भाजपा आमदार माधुरी मिसाळ आदींनी मतदानाचा हक्क बजावला.
गेल्या काही दिवसांपासून नागरिकांकडून मतदानाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे बोलले जात होते. मात्र, आज शहरात ज्याप्रकारे तरुण, मध्यम,आणि ज्येष्ठ अशाच सर्वच वयोगटातील नागरिकांनी मतदानासाठी दाखविलेला उत्साह निश्चितच सुखावह आहे. काही ठिकाणी अपुऱ्या सुविधा , लांबच रांगा, जाण्या- येण्याची साधने, मतदार यंत्रातील बिघाडे आदी समस्यांना मतदारांना तोंड द्यावे लागले . मात्र, तरीही मतदारांनी संयमाने घेत मतदान प्रक्रियेला सहकार्य केले.