पुणे : आईच्या गर्भात असतानाच वडिलांचा मृत्यू झाला तर वयाच्या पाचव्या वर्षी आईचे छत्रही हरपले. लहानपणापासून संघर्ष पाचवीला पुजलेला. वाट्याला आलेले अनाथपण भोगले. एमआयडीसीतील कंपनीत कामही केले. असा प्रवास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या पीएसआय परीक्षेत यश मिळवत अधिकारी होण्याचा मान ३२ वर्षीय तरुणाने मिळवला. या तरुणाचे नाव अमोल मांडवे. पहिल्याच प्रयत्नात अनाथ प्रवर्गातून अमोल पीएसआय झाला आहे.
अमोल हा मूळचा सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कुमठे गावचा. लहानपणी आई आणि वडिलांचे छत्र हरपल्याने आजीने संभाळ केला. अमोलचा मोठा भाऊ आणि ते दोघे हॉस्टेलला राहिले. पुढे आत्याने त्यांचा सांभाळ केला. दहावी पास झाल्यानंतर अमोलने आयटीआय करून नोकरीचा मार्ग स्वीकारला. नोकरी करतानादेखील शिक्षणात खंड न पडू न नेता बीए पूर्ण केले. नोकरी करत असताना अमोल विवाह बंधनात अडकला. त्याचा मुलगा आता पाच वर्षांचा आहे. अमोल पनवेलमधील कळंबोली येथे वास्तव्यास असून, तळोजा एमआयडीसीमधील एका कंपनीत काम करत होता. हे काम करत असताना कंपनीच्या शिफ्टच्या वेळा संभाळून अमोल अभ्यास करत होता. २०२० पासून अमोल याने अभ्यासाला सुरुवात केली.
मोठ्या भावाने केली पायवाट तयार
अमोल यांचा मोठा भाऊ संतोष मांडवे हे एमपीएससीचा अभ्यास करत होते. त्यांना या परीक्षेत यश मिळाले. सध्या ते नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनीच अमोल याला अभ्यास करण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रेरणा दिली. भावाने मिळवलेल्या यशाने अमोल देखील प्रेरित झाला.
मुख्य परीक्षा कसोटीचा काळ
काम संभाळत अभ्यास करताना अमोल यांची पत्नी ज्योती यांनी त्यांना साथ दिली. घराची संपूर्ण जबाबादारी त्यांनी घेतली. अमोल यांनी मुख्य परीक्षेसाठी कंपनीत महिनाभर सुटी टाकून पूर्णवेळ अभ्यास केला. हा कालावधी त्यांच्यासाठी कसोटीचा होता. मात्र, अभ्यास आणि ऑनलाइन क्लास करत त्यांनी मुख्य परीक्षेची तयारी केली.
''संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनात असतो. या संघर्षाला न घाबरता जिद्दीने ध्येय ठेवून प्रवास केला तर नक्कीच यश मिळते. मीदेखील याच पद्धतीचा अवलंब केला.- अमोल मांडवे''