पुणे : मेंदू मृत (ब्रेन डेड) झालेल्या तरूणाच्या अवयवदानातून चार जणांना जीवनदान मिळाले. या तरुणाचे हृदय, यकृत व दोन्ही मुत्रपिंडाचे चार गरजू रुग्णांवर प्रत्यारोपण करण्यात आले. या तरुणावर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. अवयवदान करण्यात आलेल्या २६ वर्षीय तरुणाचा दि. १४ फेब्रुवारी रोजी सातारा महामार्गावर अपघात झाला होता. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर दि. १८ फेब्रुवारीपर्यंत खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
पुढील उपचारासाठी त्याला दि. १८ फेब्रुवारी रोजी ससून रुग्णालयात हलविण्यात आले. पण उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दि. २० फेब्रुवारीला त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. त्याचे वडील अंबेजोगाई येथे शेतकरी व आई गृहिणी आहे. नातेवाईकांच्या समुपदेशनानंतर त्याचे अवयवदान करण्यास मान्यता देण्यात आली. झोनल अवयव प्रत्यारोपण समितीच्या प्रतीक्षा यादीनुसार त्याचे हृदय व यकृत पुण्यातील खासगी रुग्णालयातील गरजू रुग्णाला दान करण्यात आले. एक मूत्रपिंड नाशिकच्या खासगी रुग्णालयातील रुग्णाला तर दुसरे मूत्रपिंड ससून रुग्णालयातील रुग्णाला दान करण्यात आले. ही ससूनमधील १४ वी मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रिया आहे. अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. राजेश श्रोत्री, डॉ. भालचंद्र कश्यपी, डॉ. अमेय पाटील, डॉ. अभय सदरे, डॉ. शशिकला सांगळे, डॉ. रोहन धारापवार, डॉ. शार्दूल दाते, भूलतज्ज्ञ डॉ. विद्या केळकर, डॉ. योगेश गवळी, डॉ. गायत्री तडवलकर यांच्या पथकाने मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली. त्यांना रुखसाना सय्यद सिस्टर, अर्जुन राठोड व आकाश साळवे यांंनी सहकार्य केले.