लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: महागाईच्या विरोधात काँग्रेस महिला आघाडीने शनिवारी सकाळी निदर्शने केली. झाशीची राणी चौकात रस्त्यावर ठिय्या देऊन केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
महिला आघाडी शहराध्यक्ष सोनाली मारणे, माजी महापौर कमल व्यवहारे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, महापालिकेतील गटनेते आबा बागूल तसेच महिला कार्यकर्त्या, पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
जगभरात पेट्रोलचे दर कमी होत आहेत आणि भारतात मात्र मोदीसरकार दररोज इंधनाचे भाव वाढवतच आहे. १ लिटरने शंभरी पार केली, तरी थांबायचे नाव नाही. खाद्यतेलाचे दरही आकाशाला भिडले आहेत. सामान्यांचे जगणेच मोदीसरकारने महाग केले आहे, अशी टीका मारणे यांनी केली.
छाजेड म्हणाले की, या सरकारला दरांवर नियंत्रण ठेवता येत नाही. काँग्रेस सरकारच्या काळात प्रथम सामान्यांचा विचार केला जायचा, मोदीसरकार मात्र मूठभर उद्योजकांसाठी काम करत आहे.
खाद्यतेलाचे डबे, एक गाडी तसेच गॅस टाकी घेऊन महिला पदाधिकाऱ्यांनी रस्त्यात ठिय्या दिला. हातात केंद्र सरकारचा, भारतीय जनता पार्टीचा निषेध करणारे फलक घेऊन घोषणा दिल्या. पोलिसांच्या विनंतीवरून आंदोलन लगेच थांबवण्यात आले.