पुणे : लॉकडाऊनमध्ये संपूर्ण शहर दाराआड सुरक्षित बसलेले असताना रस्त्यावर उतरुन स्वच्छतेपासून आरोग्यापर्यंतच्या सेवा देणा-या कोरोना योद्ध्यांनाही कोरोनाची लागण झाली. यातील ४६ जणांचा मृत्यू झाला. कोरोनामध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना महापालिकेकडून ५० लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु, ही घोषणा अद्यापही प्रत्यक्षात उतरू शकली नाही. मृतांचे नातेवाईक पदाधिकारी आणि अधिका-यांचे उंबरे झिजवत असून त्यांना याबाबत कोणतीही ठोस माहिती दिली जात नाही.
महापालिकेच्या ४६ कर्मचा-यांना या काळात प्राण गमवावा लागला. यातील ४४ जण पालिकेचे कायम कर्मचारी होते. तर, दोन कंत्राटी कर्मचारी होती. यामध्ये परिचारिका, डॉक्टर, अभियंते, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, विविध विभागात काम करणारे अधिकारी-कर्मचारी यांचा समावेश आहे. केंद्र शासनाने सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन लागू केलेले होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात पालिकेने सप्टेंबरपर्यंत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना मदत देण्याचा निर्णय घेतला होता.
पालिकेकडून ५० लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. यासोबतच राज्य शासनाकडूनही ५० लाख देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु, राज्य शासनाकडूनही अद्याप याबाबत काहीही कळविण्यात आलेले नाही. मृतांच्या नातेवाईकांना पालिकेने ५० लाख रुपये किंवा २५ लाख आणि पालिकेत नोकरी देण्यात येणार होती. नुकतेच स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सप्टेंबरनंतरही कोरोनाशी दोन हात करताना मृत्यू झालेल्या पालिकेच्या कर्मचा-यांच्या नातेवाईकांना ही मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परंतु, या मदतीचे वाटप कधी होणार असा प्रश्न आहे. दर महिन्यात नवीन तारीख दिली जात आहे. नातेवाईक प्रशासन आणि पदाधिका-यांकडे सातत्याने याबाबत पाठपुरावा करीत आहेत. परंतु, त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
===
कमावत्या लोकांचा झालाय मृत्यू
अनेकांच्या घरातल्या कमावत्या लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक कुटुंबांसमोर जगण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. नोकरी किंवा मदतीच्या रकमेवर त्यांची भविष्याची आशा टिकून आहे. आपल्याला मदत मिळेल या आशेने महापालिकेमध्ये खेटे मारणा-या नातेवाईकांची ही अवहेलना कधी थांबणार असा प्रश्न आहे.
===
माझे आजोबा दत्तात्रय एकबोटे हे पुण्याचे महापौर होते. आयुष्यभर त्यांनी जनतेची सेवा केली. माझे वडील पालिकेच्या कीटकनाशक विभागात काम करीत होते. दुर्दैवाने त्यांचा कोरोना ड्युटीवर असताना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला. माझे वडील एकमेव कमवते होते. आम्हाला मदतीची अपेक्षा होती. परंतु, फक्त आश्वासने मिळत आहेत. माजी महापौरांच्या कुटुंबीयांची ही अवस्था असेल तर अन्य कर्मचा-यांची काय स्थिती असेल?
- गौरव एकबोटे