जुन्नर : जुन्नर पोलिसांच्या सतर्कतेमुळे विहिरीत पडलेल्या भाऊ-बहिणीला जीवदान मिळाले.जुन्नर न्यायालयाच्या मागील आवारात एका विहिरीत शिरोली खुर्द येथील चिंतामण ढोमसे (वय ४२) अंधारामुळे विहीर न दिसल्याने विहिरीत पडले. जुन्नरमधील ऐतिहासिक गढीच्या आवारात ही विहीर आहे. पडीक असलेल्या या विहिरीत पाणी नसते. ढोमसे विहिरीत पडल्याने भाऊ दिसत नाही, म्हणून त्याची बहीणही पण शोधताना विहिरीत पडली. विहिरीच्या परिसरात वाळलेले गवत असल्याने तसेच अंधारामुळे विहीर लक्षात न आल्याने तसेच विहिरीस संरक्षक कठडे नसल्याने दोघेही विहिरीत पडले. जखमी अवस्थेत असलेल्या ढोमसे यांच्या मोबाईलवर फोन आल्यावर मोबाईलच्या लाईटमुळे मोबाईल विहिरीत पडलेला मिळाला. मोबाईलवरून त्यांनी जुन्नर पोलीस ठाण्याला फोन करून माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक कैलास ढोमसे, उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलीस यंत्रणेने शिवाजी ट्रेल या संस्थेचे कार्यकर्ते व नगरपालिकेच्या फायर ब्रिगेड कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांना बाहेर काढले व ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.दोघांची प्रकृती चांगली आहे. मदतकार्यात जितेंद्र देशमुख, राहुल पातुरकर, विनायक खोत, अतुल परदेशी, गोटू परदेशी, संजय नवले, रौफ इनामदार, राजकुमार चव्हाण, फायर ब्रिगेड पथक यांनी मदत केली. जखमी वडज खंडोबा देवस्थान दर्शनावरून आले होते. (वार्ताहर)२ वर्षांपूर्वी वृद्धाचा मृत्यूदोन वर्षांपूर्वी याच पडीक विहिरीत रात्रीच्या वेळेस पडल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. पडीक तसेच पाणी नसलेली ही विहीर बुजवून टाकण्याची आवश्यकता आहे.
विहिरीत पडलेल्या भावंडांना जीवदान
By admin | Published: December 27, 2016 3:01 AM