पुणे : मानसिक आजार असलेल्या व्यक्तीचा सांभाळ करताना कुटुंबातील आईवडील, पालक, भावंडे, पतिपत्नी; तसेच इतर नातेवाइकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्या व्यक्तीला आजारातून सावरताना करावा लागणारा त्याग, नातेसंबंध, घराचे घरपण टिकविण्याची कसरत, समाजाचा दृष्टिकोन यांसह विविध आव्हाने पेलताना आलेल्या अनुभवांतून मनोरुग्णांच्या काळजीवाहकांचे आयुष्य उलगडत गेले.जागतिक आरोग्य दिनानिमित्त त्रिमिती ट्रस्टच्या वतीने ‘काळजी घेण्याचे विविध पैलू’ या विषयावर आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मनोरुग्ण व्यक्तींच्या नातेवाइकांनी म्हणजे काळजीवाहकांनी (केअरगिव्हर्स) त्यांचे अनुभव कथन केले. या संवादात ज्येष्ठ अभिनेते व मनोविकारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे, मनोविकारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके, डॉ. विद्याधर वाटवे, मानसतज्ज्ञ डॉ. शिरीषा साठे सहभागी झाले होते.मानसतज्ज्ञ डॉ. संजोत देशपांडे यांनी सर्वांशी संवाद साधला. या कार्यक्रमापूर्वी ‘मळभ’ ही एकांकिका सादर करण्यात आली. यामध्ये मनोरुग्ण व त्यांची काळजी घेणाऱ्या नातेवाइकांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला.संवादामध्ये सुभाष चतुर यांनी त्यांचा मुलगा अजयला सक्षम करण्यासाठी केलेले प्रयत्न सांगितले. तसेच, मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना समाजाकडून मिळणाºया दुजाभावावरही नाराजी व्यक्त केली. डॉ. कांचन खरे यांनी मानसिक आजार असलेल्या पतीला सांभाळण्या बरोबरच मुलाला चांगल्या वातावरणात वाढविण्यासाठी केलेल्या कसरतीचे अनुभव सांगितले. त्यांच्या अनुभवांवर बोलताना डॉ. वाटवे म्हणाले की, काळजीवाहकांना अशा परिस्थितीत स्वत: मानसिक आरोग्याकडेही जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. ही तारेवरची कसरत करताना स्वत:साठी वेळ द्यायला हवा.मानसिक रुग्णांचा सांभाळ करताना अनेकवेळा नातेवाइकांना नैराश्य येते. पण त्यातून पुन्हा उभे राहता येते, असे डॉ. लुकतुके यांनी नमूद केले.संवेदनक्षम असणे महत्त्वाचेमानसिक आजारांच्याबाबत बुद्धीने सगळे प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी संवेदनक्षम असायला हवे. कोणत्याही सर्वसामान्य कुटुंबात एकमेकांची काळजी घेणे आवश्यक असते; अन्यथा घरात रुग्ण असताना नैराश्य येते. खरे शहाणपण आपले वेडेपण लपविण्यात आहे. कुटुंब रक्ताच्या नव्हे मनाच्या नात्याने ठरायला हवे. नाती जपणे, त्यासाठी दोन पावले मागे जाणे, एकमेकांच्या जीवनाचा भाग बनविणे महत्त्वाचे आहे.- डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेते व मनोविकारतज्ज्ञ
उलगडले मनोरुग्णांच्या काळजीवाहकांचे आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2018 12:34 AM