दौंडच्या ग्रामीण भागातील पशुधनाची आरोग्य सेवा अडचणीत
खासगी पशुवैद्यकांच्या संपाचा परिणाम
वासुंदे : दौंडच्या ग्रामीण भागातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणात दुग्धोत्पादनाचा व्यवसाय करत आहेत. त्यामुळे संकरीत गायींचे प्रमाण या भागात तुलनेने जास्त आढळून येते. मात्र गेली ६ दिवसांपासून सुरू असलेल्या खासगी पशुवैद्यकांच्या संपामुळे पशुधनाची आरोग्य सेवा अडचणीत सापडली आहे.
भारतीय पशुवैद्यक परिषद १९८४ (ब) नुसार लागू करण्यात आलेल्या कायद्यात बदल करून खासगी व सरकारी पशुवैद्यकांना कायद्या आधारे नोंदणी करून सुधारीत नोंदणीकृत पदविका प्रमाणपत्र मिळावे या व इतर प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. पशुवैद्यकांच्या संपामुळे जनावरांना वेळेत उपचार मिळण्यास अडचणी येत आहेत. पशुधनाच्या प्रमाणात शासकीय पशुवैद्यक नसल्याने याचा ताण उपलब्ध असलेल्या शासकीय पशुवैद्यकांवर येत आहे. यासाठी शासनाने तात्काळ या संपाची दखल घेऊन खासगी पशुवैद्यकांच्या मागण्यांवर तोडगा काढल्यास पशुधनाची आरोग्य सेवा सुरळीत होईल, अशी मागणी पशुपालक शेतकऱ्यांकडून होत आहे.