पुणे : पुण्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यातच दुपारच्या वेळेत गरमी तर रात्री थंडी अशी स्थिती निर्माण झाली होती. अखेर आज मुसळधार पावसाने पुण्याला झोडपून काढले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते जलमय झाल्याचे दिसून आले. पुण्यात गेल्या काही वर्षांपासून पाऊस पडल्यानंतर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे. नागरिक वारंवार तक्रार करूनही पुणे महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे. पावसानंतर नागरिकांचा प्रचंड संतापही दिसू लागला आहे. आपण पुण्यात राहतो कि पाण्यात असाही सवाल पुणेकर उपस्थित करू लागले आहेत. महापालिकेने पाणी साचण्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा. अशी मागणी नागरिक करत आहेत.
शहराच्या मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरातही पावसाने धुमाकूळ घातला आहे. नागरिकांना गुडघाभर पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. तसेच वाहतूककोंडीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. काही भागात पार्किंग केलेल्या गाडयाही पडल्याचे दिसून आले आहे.
मॉन्सूनने पुन्हा एकदा परतीचा प्रवास लांबवला आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे ही तारीख आणखी १ आठवडा दिवस लांबू शकते असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईतून ८ तर पुण्यातून ९ ऑक्टोबरला मॉन्सून परततो. परतीच्या या पावसामुळे हातीशी आलेल्या पिकांचे नुकसान वाढण्याची भीती शेतक-यांमध्ये आहे. त्यातच पुण्यात मंगळवारी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. यंदा मॉन्सून राजस्थानमधून २० सप्टेंबर रोजी अर्थात वेळेत परतला. परंतु त्यानंतर सुमारे आठवड्याने पंजाबमधून मॉन्सूनने माघार घेतली. उत्तर भारतातील पावसामुळे ३ ऑक्टोबर दरम्यान गुजरात, राजस्थान मध्य प्रदेशाचा काही भाग, पंजाब या भागातून त्याने कुच केली. मात्र, अजुनही त्याचा प्रवास अडखळलेलाच आहे.
मॉन्सूनची माघारीची तारीख
जळगाव, मालेगाव ६ ऑक्टोबरनागपूर ७मुंबई, नगर ८पुणे, औरंगाबाद, परभणी ९बारामती १०सातारा १२कोल्हापूर १३