अभिजित कोळपे
पुणे : अलीकडच्या काही घटनांवरून समाज अत्यंत आत्मकेंद्री होत चालला असल्याचे चित्र आहे. अशातच वंचित-पीडितांसाठी काम करणारे लोक अभावानेच पाहायला मिळतात. बुलढाणा येथील अनाथ, दिव्यांग, मनोरुग्णांवर मायेची पाखर धरणाऱ्या दिव्या फाउंडेशनने चार वर्षांपूर्वी कुटुंबापासून दूर गेलेल्या एका किशोरवयीन मुलाला कुटुंबीयांच्या सुपूर्द केले. नियोजित नसलेला पण भावनिकतेची किनार असलेला हा स्नेहमिलन सोहळा नुकताच पुण्यात पार पडला. हरवलेला मुलगा मिळाल्यानंतर चेन्नईमधील त्या कुटुंबीयांनी अक्षरश: हंबरडाच फोडला.
चेन्नई येथून सन २०१९ मध्ये एक मानसिक स्थिती ठिक नसलेला किशोरवयीन हा मुलगा काही दिवसांनंतर नांदेड पोलिसांना आढळला होता. तो मुलगा त्याचे नाव देखील सांगू शकत नव्हता. कचऱ्यामध्ये राहत असे, जे मिळेल ते खायचे असे जीवन जगणाऱ्या मनोयात्रीला नांदेडमधील सामजिक कार्यकर्ते दीपक यांनी दिव्य-सेवा पुनर्वसन प्रकल्पाचे संस्थापक अशोक काकडे यांच्याशी संपर्क केला. पोलिसांच्या व दिपकच्या मदतीने नांदेड येथून अशोक काकडे यांनी त्या मनोयात्रीला बुलढाण्यात आणले.
दरम्यान, बुलढाणा येथील दिव्य-सेवा प्रकल्पात या मुलाची मनोभावे सेवा केली. डॉ. कुणाल शेवाळे व डॉ. विश्वास खर्चे यांनी वैद्यकीय उपचार आणि समुपदेशन केले. त्यानंतर हळूहळू या मुलाची मानसिक स्थिती सुधारू लागली. कालांतराने त्याने आम्हाला त्याचे नाव राजा ब्रामा पश्चिमत्यु उर्फ भोला तसेच तो कोणत्या शहरातील आहे हेही त्याने सांगितले. यानंतर त्याच्या नातेवाईकांकडे पोहचवण्याचा आम्ही निश्चय केला. प्रशासकीय पातळीवर बरेच प्रयत्न केले. या प्रयत्नांना काही दिवसांपूर्वी यश प्राप्त झाले. राजाची आजी आर्य गणेश आणि मावशी ललित आनंदराज यांच्याशी संपर्क केला. व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्या नातेवाईकांशी फोनवर चर्चा केली.
दिव्या फाऊंडेशनचे काम करणाऱ्या तसेच पुण्यामध्ये कॉलेज शिक्षण घेत असलेला विकेश बागले या युवकाच्या मदतीने आम्ही दुसऱ्या दिवशी ताबडतोब त्याला घेऊन पुण्यात त्याच्या नातेवाईकांकडे निघालो. तेथे राजा ऊर्फ भोलाला त्याच्या घरच्यांच्या ताब्यात दिले. पुणे येथील विकेश बागले, नितीन हागे, शैलेश गिरे, ऋतुजा साळवी, कुंजल अहीरराव, जयकिशोर येलकर यांनी मोलाची साथ दिली.