धायरी : पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील तुकाईनगर भागात असणाऱ्या सार्वजनिक स्वच्छतागृहात सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पुरुष जातीचे जिवंत नवजात अर्भक सापडले आहे. याबाबत सिंहगड रस्ता पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. मिळालेली माहिती अशी की, वडगांव बुद्रुक परिसरातील तुकाईनगर भागात एक जोडपे गेल्या चार - पाच वर्षापासून राहत आहे. संबंधित महिला ही गर्भवती होती. मात्र गर्भवती असल्याचे शेजारील लोकांना समजू नये यासाठी ती महिला घराबाहेर पडत नव्हती. बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती स्वच्छ्तागृहात गेला असता त्यांना तिथे लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला. त्यांनी नीट निरखून पाहिले असता तिथे असलेल्या स्वच्छ्तागृहाच्या भांड्यामधे पुरुष जातीचे जिवंत अर्भक दिसून आले. याबाबत पोलिसांना तातडीने कळविण्यात आल्यानंतर त्या अर्भकाला तेथून हलवून ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून मी प्रातःविधी साठी गेले होते. मला काही समजले नाही असे म्हणत त्या महिलेने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असला तरी ती महिला खोटं बोलत असल्याचे पोलिसांच्या तपासणीत उघड झाले आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
निर्दयी महिलेबाबत नागरिकांत संताप...
घडलेल्या प्रकारावेळी तेथे जमलेल्या काही नागरिकांनी त्या अर्भकाचे व्हिडीओ काढले. काही क्षणातच ते व्हिडिओ व्हायरल झाले असून अशा निर्दयी महिलेला कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.