Pune Porsche accident: पुणे : कल्याणी नगर अपघात प्रकरणात अल्पवयीन कारचालक बाळाला तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्यासह विविध अटींवर अवघ्या पंधरा तासांत जामीन देणारे बाल न्याय मंडळाचे सदस्य एल. एन. धनावडे हे गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात होते. गुरुवारी (दि. ३०) ते माध्यमांच्या प्रतिनिधींच्या नजरेस पडले. यावेळी पोर्शे घटनेसंदर्भात त्यांना प्रश्न विचारले असता त्यावर त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देणे टाळले. (pune porsche accident update, pune porsche crash, judge LN Dhanawad)
पोर्शे प्रकरणात धागेदोरे समोर येत आहेत. अनेक घटकांवर कारवाई करण्यात येत आहे. यासंदर्भात बाल न्याय मंडळाच्या सरकार नियुक्त सदस्यांचीही चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी महिला व बालविकास विभागाने समिती स्थापन केली आहे. या सदस्यांकडून कारचालक बाळाला जामीन देताना कायदेशीर बाबींचे पालन झाले आहे का?, याची खातरजमा समिती करणार आहे. पुढील आठवड्यापर्यंत चौकशीचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले आहे.