लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : काँग्रेसने मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची भूमिका घेतल्यानंतर, आता राज्यतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील स्वबळावर लढविण्याची तयारी सुरू केली असल्याचे काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी लसीकरणाच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जोडे हाणतील, या वक्तव्यावर हीच तर शिवसेनेची भाषा आहे, असे सांगून अधिक बोलणे टाळले.
कोथरूड येथील राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभागातील पाच हजार महिलांचे मोफत लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन नाना पटोले यांच्या हस्ते झाले. या वेळी व्यासपीठावर अन्न औषध व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख महापालिकेतील गटनेते आबा बागुल, नगरसेवक अरविंद शिंदे, आदी उपस्थित होते.
डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, कोरोनाच्या काळात राहुल गांधी यांनी मागील दीड वर्षे सामाजिक भान ठेवून काम केले. त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करता, सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन केले. राहुल गांधी यांचा वाढदिवस प्रदेश काँग्रेसने संकल्प दिन म्हणून साजरा केला. आगामी विधानसभा न लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळविणे व सामान्याचे प्रश्न सोडवविणे हा आमचा संकल्प आहे.
महाराष्ट्रातून भाजप हद्दपार करण्याचे काम केवळ नाना पटोले हेच करणार आहेत. केंद्र सरकार कायम महाराष्ट्रावर दुजाभावाची वागणूक देत आहे. लोकसंख्येची संख्या विचारात घेऊन केंद्राने लस द्यावी अशी आमची मागणी होती, पण तसे झाले नाही. आता लसीकरण खुले केल्याने आम्ही शंभरटक्के लसीकरण करू.
पटोले म्हणाले की, इंग्रजांनी देशाला लुटले, त्यांच्या विरोधात बंड पुकारण्यात आला. मोठ्या संघर्षानंतर देशाला स्वातंत्र्य लाभले. देश उभा करण्याचे काम पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. देशाचा पहिला बजेट ३५० कोटी रुपयांचा होता. सुईपासून रॅकेट निर्माण करण्याचे काम काँग्रेसच्या काळात झाले. मात्र गेल्या सात वर्षांत केंद्रातील भाजपने देशाची वाट लावली. नोटबंदी आणि जीएसटी मुले सामान्य नागरिकांना मोठा त्रास झाला. त्यावेळी मोदींनी काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा होईल असे सांगितले होते. पण त्यांनी सामान्य नागरिकांना फसवलं.
--------------------------------