लोकमत न्यूज नेटवर्क
माळेगाव : आगामी विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात स्थानिक सक्षम उमेदवार देण्याचे संकेत माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माळेगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना दिले.
माळेगाव येथे युवा मोर्च शाखा उद्घाटन, भाजप संपर्क कार्यालय उद्घाटन व युवा वॉरियर अभियानाच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. या वेळी बावनकुळे यांनी जणू आगामी विधानसभा निवडणुकीची बारामती विधानसभा मतदारसंघातील रणनीतीच स्पष्ट केली. बावनकुळे म्हणाले, पवार यांच्या विरोधात स्थानिक सक्षम उमेदवार दिला जाईल. त्यांना विधानसभा निवडणुकीत तालुक्यातच गुंतवून ठेवण्यास प्राधान्य दिले जाईल. राज्यात १८ ते २५ वर्षे वयोगटातील सुमारे २५ लाख युवकांना युवा वॉरियर बनवणार आहे. हे अभियान २६ जानेवारीपर्यंत राज्यात सुरू राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रात युवा वॉरियरच्या ३०० शाखा स्थापन करण्यात आल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व गावे, वाड्यावस्त्या व प्रत्येक मतदान बुथवर युवा वॉरियर स्थापन करणार आहे.
या वेळी युवा मोर्चाचे जिल्हा सचिव प्रमोद तावरे यांच्या शिवनगर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन युवा मोर्चाचे जिल्हा सचिव प्रमोद तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अध्यक्ष प्रतीक अडागळे, अमन पारखे, गणेश सोलनकर, ओंकार वाघमोडे, किरण गायकवाड, मंगेश लोणकर,विनायक तावरे, आकाश नरळे पाटील यांनी केले.
याप्रसंगी कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे, दिलीप खैरे,भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष किरण दगडे पाटील, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अॅड. ज्ञानेश्वर माने, जिल्हा सचिव प्रमोद तावरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कोट
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे यांच्या विरोधात माध्यमांमध्ये विसंगत माहिती देऊन तणाव निर्माण केला जात आहे. वास्तविक देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे यांच्यात अंतर्गत वाद नसून दोघांत बहीणभावाचे, स्नेहाचे व प्रेमाचे नाते आहे.
-चंद्रशेखर बावनकुळे- माजी ऊर्जामंत्री
फोटो ओळी- भाजप युवा मोर्चा शाखा उद्घाटन करताना माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर पदाधिकारी.
३००७२०२१ बारामती-०५