पुणे: कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सेवा संघ यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५० लोकांमध्ये कार्यक्रमाचे नियोजन करत आहे. परंतु स्थानिक पक्षाचे कार्यकर्ते या कार्यक्रमाला विरोध करत आहेत, असा आरोप कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केला. या वेळी शशिकांत शेलार, विवेक बनसोडे, सुनील यादव, शाम गायकवाड, नीलेश गायकवाड, विशाल सोनवणे आदी उपस्थित होते.
वाघमारे म्हणाले,
दरवर्षी विजयस्तंभ सजावटीबरोबरच सामुदायिक बुद्ध वंदना, धम्मदेसना, शौर्य पहाट, आणि समाजप्रबोधनपर कार्यक्रम होतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमी लोकांमध्ये कार्यक्रम करण्याचे ठरवले होते. तसेच भीम अनुयायांना स्तंभाजवळ गर्दी न करता ऑनलाइन पाहण्याची सोय करण्यात आली होती. पण या पारंपरिक कार्यक्रमाला माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, विवेक चव्हाण, राहुल डंबाळे असे स्थानिक पक्षाचे कार्यकर्ते विरोध करत आहेत. या कार्यक्रमाला परवानगी दिली, तर आम्ही हजारोंच्या संख्येने सभा घेऊ, अशी धास्ती ते दाखवत आहेत.
प्रशासनाचे आदेश आल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. प्रशासनाने या धार्मिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.