लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: कार्यकर्ता जगवायचा असेल, तर स्वबळावरच लढावे लागेल, ही भूमिका श्रेष्ठींना पटली आहे, त्यांनी त्यास संमती दिली आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आपण स्वबळावरच लढणार, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. महापालिकेचा प्रभाग हा दोनचाच राहिल असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांची बैठक शुक्रवारी दुपारी पटोले यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी बोलताना पटोले म्हणाले, स्वबळाची मागणी तुमच्यासाठीच केली आहे. ती राहुल गांधींनी मान्य केली आहे. आता जबाबदारी तुमची आहे, असे पटोले म्हणाले.
या वेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, ऊल्हास पवार पालिकेतील गटनेते आबा बागूल तसेच पक्षाचे आजीमाजी नगरसेवक, आमदार, शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यातच नाही तर आता देशातच राजकीय बदल होणार आहे. महापालिकेचा तर विषयच नाही. काँग्रेस हवी ही आता जनतेचीच भावना आहे. लोकं त्यांना कंटाळली आहेत. तुम्ही आता पात्र व्हायला हवे. पक्ष महत्वाचा हे नेहमी लक्षात ठेवा. प्रदेशाध्यक्ष म्हणून सर्व मदत करू, पण काम करणारे दिसायला हवे. केंद्र सरकारच्या धोरणाचा झळ सामान्य नागरिकांना बसू लागली आहे. सर्व क्षेत्रात वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. याच मुद्द्यांवर आपल्याला त्यांना हरवायचे आहे, असे पटोले म्हणाले.
शहराध्यक्ष बागवे यांनी प्रास्तविक केले. उपस्थितांच्या प्रश्नांना पटोले यांनी उत्तरेही दिली. नगरसेवक अविनाश बागवे यांनी सूत्रसंचालन केले. गटनेते बागूल यांनी आभार व्यक्त केले.