पुणे: पहलगाममध्ये फिरण्यासाठी म्हणून गेलेले पुण्यातील पर्यटक दांपत्य धनंजय जाधव व पूजा जाधव तेथील दहशतवादी हल्ल्यात अडकले, मात्र घाबरून न जाता त्यांनी स्थानिक व्यावसायिकांना एकत्र केले व तिथेच दहशतवादाच्या विरोधात मोर्चा काढला. स्थानिक तरूणांनी या मोर्चात उत्स्फुर्त सहभाग घेत त्यांना साथ दिली.
पूजा जाधव यांनी सांगितले कि, आमची इच्छा होती कि ८ दिवस काश्मीर बघू. काश्मीर हे खूप सुंदर आहे. येथील लोकही चांगली आहेत. पण कालच्या घटनेनंतर स्थानिक, पर्यटक सगळे घाबरले आहेत. आज ते सगळे रोडवर आले आहेत. भारताच्या विरुद्ध जे कुणी कटकारस्थान करतील त्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल अशी त्यांनी शपथच घेतली आहे. यावेळी हिंदू - मुस्लिम भाई भाई, भारत हमारी जान है अशी घोषणाबाजी करत काश्मीरमध्ये स्थानिक जाधव दाम्पत्याबरोबर रस्त्यावर उतरले आहेत.
धनंजय जाधव स्वराज्य पक्षाचे राज्य सरचिटणीस आहेत. त्याचे नुकतेच पूजा यांच्याबरोबर लग्न झाले. फिरण्यासाठी म्हणून ते जम्मू काश्मिरला गेले होते. २२ एप्रिलला सकाळी ते श्रीनगरमध्ये उतरले. नियोजित कार्यक्रमानुसार ते लगेच दुपारनंतर पहलगामला निघणार होते. मात्र सायंकाळी तिथे दहशतवादी हल्ला झाला व ते श्रीनगरमध्येच अडकले. बुधवारी सकाळी धनंजय व पुजा यांनी स्थानिक नागरिकांबरोबर संवाद साधण्यास सुरूवात केली. त्यावेळी त्यांना बहुसंख्य व्यावसायिकांनी पर्यटकच आमचे अन्नदाते आहेत, शेती फक्त २ महिने असते, बाकी प्रपंच पर्यटकांवरच चालतो असे सांगितले.
धनंजय यांनी सांगितले पर्यटन हाच इथला मुख्य पाया आहे. पर्यटक नसतील तर सामान्य कुटुंबे रस्त्यावर येतील. त्यामुळेच इथे दहशतवादी हल्ला केला जातो. स्थानिक व्यावसायिकांना त्याविषयी सांगितले त्यावेळी त्यांनी आम्ही कधीही दहशतवाद्यांना साथ देणार नाही, त्यांचा आम्हाला काहीही उपयोग नाही, उलट त्रासच आहे. आता परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत पर्यटकांना ओघ आटेल व आमची उपासमार होईल अशी खंत व्यक्त केली.
पुणे महापालिकेच्या माजी नगरसेवक असलेल्या रुपाली पाटील-ठोंबरे याही आपल्या कुटुंबियांबरोबर काश्मिरला गेल्या आहेत. हल्ल्यामुळे त्याही तिथे अडकून पडल्या. त्यांच्याबरोबर अन्य काही पर्यटक आहेत. स्थानिक आदिलभाई या व्यावसायिकाने या सर्वांना आश्रय दिला आहे. त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था त्यांनीच केली आहे. हिंदुंच्या मदतीला मुस्लिम आले आहेत अशी भावना रुपाली पाटील-ठोंबरे यांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केली आहे.