लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गुन्हेगारी टोळी तयार करून खंडणी, फसवणूक, दंगा करणे असे गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगार महिलेवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली असून तिची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. रेकॉर्डवरील महिलेवर एमपीडीएखाली कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
रेश्मा बापू भालशंकर (वय ४५, सध्या रा. आंबेडकर वस्ती, अंतुलेनगर, येवलेवाडी, मूळ रा. भीमनगर, कोंढवा खुर्द) असे या महिलेचे नाव आहे.
रेश्मा भालशंकर ही पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. तिने आपल्या साथीदारांसोबत मिळून कोंढवा परिसरातील गरीब व गरजू लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत खंडणी, फसवणूक, घराविषयक आगळीक, दंगा असे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील ३ वर्षांत तिच्याविरुद्ध ४ गुन्हे दाखल आहेत. महिलेची परिसरात दहशत आहे. त्यामुळे तिच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली होती. तसेच संबंधीत महिला लोकांना सरकारी जमीन कोणत्याही सरकारी कागदपत्राशिवाय विक्री करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्याच्या उद्देशाने फसवणूक करत होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थाबद्धतेचा प्रस्ताव तयार करून पोलीस आयुक्तांकडे सादर केला होता. प्रस्तावाची पडताळणी करून आयुक्तांनी रेश्मा भालशंकर या सराईत गुन्हेगार महिलेला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गेल्या ११ महिन्यांत तब्बल ३५ गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्ध केले आहे.