पुणे : पुरंदरविमानतळाच्या जागेवरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी देखील अद्याप जागा निश्चित नसल्याचे सांगत आणखी गुगली टाकली. यामुळे पुरंदर आणि खेड तालुक्यातील लोकांमध्ये अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे.
पुरंदर विमानतळाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुरंदर विमानतळाच्या जागेबाबतचा तांत्रिक अहवाल आलेला नाही. त्यामुळे विमानतळासाठी पुरंदरची जागा अजून निश्चित केलेली नाही. विमानतळासाठी आपल्याकडे तीन पर्याय आहेत. जनतेच्या मागणीनुसार खेड, चाकणच्या जागेचा विचार करावा लागेल. अजून विमानतळाची जागा निश्चित झाली नाही. शेतकऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही. तीन जागांची पाहणी करुन माहिती जमा केली जात आहे, असे स्पष्ट केले होते.
कोरोना आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अद्याप पुरंदर विमानतळाबाबत जागा निश्चित नसल्याचे स्पष्ट केले. जागा अंतिम होईल तेव्हा सांगू असे देखील पवार यांनी स्पष्ट केले. पुरंदर विमानतळ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने पुरंदर तालुक्यातील जागेसाठी विरोध केल्याने दोन्ही पवार यांनी जागा निश्चितीबाबत अशी विधाने करून गुगली टाकल्याची चर्चा आहे. पुरंदर तालुक्यातील नवीन जागेचा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी दिल्ली एअरपोर्ट ऑथॉरिटीकडे पाठविण्यात आला आहे. हा अहवाल आल्यानंतर विमानतळ पुरंदर तालुक्यातच होणार असल्याचे बहुतेक सर्व वरिष्ठ अधिका-यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, दोन्ही पवारांनी केलेल्या विधानमुळे मात्र खेड आणि पुरंदर तालुक्यातील लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.