पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी एका दिवसात आठ हजार रुग्णांचा टप्पा कधीच ओलांडला असून, पुणे पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचे व्हाॅटस्पाॅट ठरले आहे. यामुळेच आज रोजी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत होणा-या कोरोना आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार पुण्यात लॉकडाऊन जाहिर करतात की निर्बंध अधिक कडक करणार याकडे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
पुणेकरांनी नियमांची कडक अंमलबजावणी करा व रुग्ण संख्या कमी नाही झाली तर 2 एप्रिल पासून लॉकडाऊन जाहीर करेल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील आठवड्यात घेतलेल्या बैठकीत दिला होता. या पार्श्वभूमीवर आज रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात पवार यांच्या अध्यक्षतेखालील होणा-या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीमुळे प्रशासकीय हालाचलींना वेग आला आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त, लोकप्रतिनिधी उपस्थितीत राहणार आहे.या बैठकीत पुण्यात लॉकडाऊन करायचा की निर्बंध अधिक कडक करायचे याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. अजित पवारांनी आयोजित केलेल्या बैठकीत पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोनाचा आढावा घेतला जाणार आहे. या ठिकाणी किती कोरोना रुग्ण आहेत, मृत्यू दर किती, सध्या हाॅस्पिटलची काय स्थिती आहे, कोरोना लसीकरण याचा आढावा घेतला जाईल. सध्या पुण्यात 200 कंटेन्मेंट झोन आहेत. या झोनमध्ये कडक निर्बंध लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यात कडक निर्बंध लावा मात्र लॉकडाऊन नको, असा सूरही उमटत आहे. गेल्या वर्षभर कोरोनाने सगळ्यांनाच हैराण केलं आहे. त्यातही पुण्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव पाहायला मिळाला. आता कुठे व्यवसाय पुन्हा रुळावर येतो ना येतो तोच पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे पुण्यात लॉकडाऊन लावायचा की नाही? याबाबत बैठक पार पडेल.