डमी 742
प्रवासी नसल्याने वाहने धूळ खात, घर चालविणे झाले मुश्कील
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या कडक निर्बंधाचा सर्वच क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह खासगी क्षेत्रातील वाहतुकीची देखील गती मंदावली आहे. संचारबंदीमुळे खासगी वाहतुकीला प्रवासी नाहीत अशी स्थिती आहे. तर व्यापार व उद्योगधंदे बंद असल्याने व्यावसायिक वाहने देखील धूळ खात पडून आहेत. रस्त्यावर वाहनेच कमी असल्याने याचा परिणाम गॅरेज व्यवसायावर देखील झाला आहे. एकूणच वाहने थांबली आणि त्यावरील अर्थचक्राला ब्रेक लागला.
कामच नसल्याने वाहनचालक मोठ्या अडचणीत सापडला आहे. जवळ असलेली जमा पुंजीदेखील संपत आल्याने वाहनचालक हवालदिल झाला आहे. मिळेल ते काम करण्याची तयारी असली तरीही काम करता येत नाही. त्यामुळे रोजचा खर्च भागविणे अवघड झाले आहे. मागच्या वर्षापासून बँकेचे हप्ते थकलेले आहे. कर्जाच्या डोंगराखाली वाहनचालक दबत चालला आहे. त्यामुळे आता पुढे काय, हा प्रश्न सतावत चालला आहे.
----------------------
गाड्या सुरू करणे मोठे खर्चाचे काम :
गेल्या दीड वर्षापासून अनेक गाड्या बंद अवस्थेत आहे. त्यांना सुरू करणे म्हणजे आता मोठे दिव्य असणार आहे. कारण इंजिनासह अन्य तांत्रिक दृष्टीने कामे करावे लागेल. यासाठी किमान १० ते ४० हजारपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. यातील काही स्पेअरपार्ट देखभालअभावी खराब झाले असतील त्याची देखील दुरुस्ती करावी लागणार आहे.
-----------------
करापासून सुटका नाही /
प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांंना विविध कर द्यावा लागतो. ट्रॅव्हल्ससारख्या कमर्शियल वाहनांना पार्किंगचा कर द्यावा लागतो. तसेच दर तीन महिन्याला ऑल इंडिया परमिटचा कर भरावा लागतो. शिवाय त्याचा वाढत जाणारे विम्याचे दर हे सारे वाहनचालकांना भरावेच लागणार आहे.
---------------
वाहने सुरू अन् गॅरेज बंद
अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद आहेत. काही प्रमाणात गॅरेज सकाळी उघडली जातात. पण त्यांना पूरक असणारी स्पेअर पार्टची दुकाने बंद आहे. त्यामुळे गॅरेज बंद करावे लागत आहे. रस्त्यावर वाहने सुरू अन् गॅरेज बंद असा काहीसा प्रकार पुण्यात आहे.
शहरातील वाहनांची संख्या :
दुचाकी : ३० लाख ३७५८
चारचाकी : ६,९०,९४६
ट्रक, टेम्पो व अन्य : १,४८,४७३
रिक्षा : ९०,०००
कोट :
पुण्यात लॉकडाऊनपूर्वी २५० मोटार ड्रायव्हिंग स्कूल सुरू होते. पैकी आता १०० आता बंद झाले. ड्रायव्हिंग स्कूल चालविणे आता खूप मुश्कील झाले आहे. ऑफिसचे भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार द्यावा लागतो, पण उत्पन्न नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.
- राजू घाटोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल, पुणे