राजू इनामदार- पुणे: नऱ्हे आंबेगाव व वाघोली येथील लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेतील अंध कलावंतांना कोरोना संचारबंदीचा मोठा फटका बसला आहे. त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमच बंद झाले असून त्यावरच सुरू असलेली संस्थाही आता कोलमडण्याच्या बेतात आहे. सलग १० वर्षे सुरू असलेल्या या संस्थेला आता आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.नऱ्हे आंबेगाव व कावडे वस्ती वाघोली, पुणे इथे लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेची दोन वसतीगृहे आहेत. शालेय शिक्षण पुर्ण झाल्यावर पुढील शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही संस्था सुरू करण्यात आली. संस्थेची दोन वसतीगृह आहेत. १३५ विद्यार्थी सध्या त्यात राहतात. शहरातील विविध महाविद्यालयात ते शिक्षण घेत आहेत. त्यातले बहुतेकजण वेगवेगळ्या ग्रामीण भागातील असून ऊच्च शिक्षणाच्या ओढीने पुण्यात आले आहेत.अर्जुन केंद्रे, नूतन केंद्रे-होळकर, ज्ञानेश्वर केंद्रे, कविता व्यवहारे हे संचालक आहेत. संस्था खासगी आहे. सरकारी मदत नाही. देणगीवर चालते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा एक वाद्यव्रुंद संस्थेने तयार केला आहे. या वाद्यव्रुंदाला मिळणाऱ्या कार्यक्रमांच्या बिदागीवर संस्थेची मोठी भिस्त होती. अंध कलाकारांचा वाद्यव्रुंद असल्याने त्यांना महिन्याला किमान चार तरी कार्यक्रम मिळायचे व त्यावर संस्थेचा बराचसा खर्च निघत असे.कोरोना लॉकडाऊन मुळे त्यांचा हा ऊदरनिर्वाहच बंद झाला आहे. मार्च एप्रिल व मे मध्येही त्यांचे बरेच कार्यक्रम फिक्स झाले होते. ते सर्व रद्द झाले.अर्जुन केंद्रे म्हणाले, संस्थेच्या गंगाजळीवर सुरूवातीला निभावले. नंतर पुण्यातीलच काही विद्यार्थी स्वत: होऊन आपल्या घरी गेले. गावाकडील ५० पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. त्यांचे कसे करायचे हा मोठा प्रश्न संस्थेसमोर ऊभा राहिला आहे.आर्थिक निधी उभारण्याचा कणा असलेल्या संस्थेचा सप्तसुर गीत मंच बंद पडला आहे. ही स्थिती अनिश्चित काळासाठी आहे. गणेशोत्सवातही फार बदल होईल अशी आशा नाही. मुलांना काय खाऊ घालायचे, इमारतीचे भाडे कसे द्यायचे, टँकरचे पाणी कसे उपलब्ध करुन द्यायचे हे प्रश्न आता भेडसावत आहेत. त्यामुळेच संस्थेला या काळात मदतीची अपेक्षा आहे.शक्य असल्यास संस्थेत येऊन आपण अन्नधान्य देऊ शकता. भविष्यात आपल्याकडे काही सभारंभ असतील तर कार्यक्रम सादर करुन सध्याच्या परिस्थितीत केलेल्या सहकाया जाणीव ठेवली जाईल. आर्थिक तसेच अन्य मदतीसाठी ९६८९२९४९१८, ९५२७२४६८६६, ९७३००८०८६१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केंद्रे यांनी केले.
पुण्यातील अंध कलावंत विद्यार्थ्यांच्या संस्थेला लॉकडाऊनचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 4:11 PM
कार्यक्रम बंद: संस्था कोलमडण्याच्या बेतात; मदतीची प्रतीक्षा
ठळक मुद्देसलग १० वर्षे सुरू असलेल्या या संस्थेला आता आर्थिक मदतीची अपेक्षा